मुंबई: वांद्रे येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रम नोंदणी अर्ज आणि प्रवेशपत्रावर नावाच्या जागी आक्षेपार्ह मजकूर छापून आल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून करण्यात आली हाेती. त्या तक्रारीची दखल घेऊन उच्च व तंत्रशिक्षण विभागाने कठोर पावले उचलली आहेत. तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय आणि महाविद्यालय यांनी स्वतंत्र चौकशी करून या प्रकरणाचा अहवाल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सादर केला. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम नोंदणी क्रमांक आणि अर्जाचे छायाचित्र घेऊन काहींनी त्यात फेरफार केल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आल्याचे त्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सायबर सेलकडे सोपवण्याचे आदेश चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.

वांद्रे येथील सरकारी तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रम नोंदणी अर्जात आणि प्रवेशपत्राच्या अर्जात भरलेल्या माहितीमध्ये आक्षेपार्ह मजकूर आढळला होता. या प्रकरणी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने महाविद्यालयाला तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले. तसेच तातडीने चौकशी समिती स्थापन करून संबंधित प्रकरणाचा तपास सुरू केला. या दोन्ही समित्यांचे अहवाल मंगळवारी दुपारी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे सादर करण्यात आले.

आयटी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या एका विद्यार्थ्याच्या अर्जाचा स्क्रीनशॉट काढून त्यात फेरफार करण्यात आला. संस्थेचे नाव चुकीच्या पद्धतीने लिहिले असून विद्यार्थ्याच्या नावाच्या जागी आक्षेपार्ह मजकूर होता. त्या विद्यार्थ्याला चौकशीसाठी बोलावले असता विद्यार्थ्याने प्रवेशपत्र, अभ्यासक्रम नोंदणी, परीक्षा नोंदणी अर्ज डाऊनलोड केले तेव्हा त्यात कोणताही बदल झाला नव्हता, अशी कबुली दिली. महाविद्यालयाने विद्यार्थ्याचे तपशील घेऊन त्याच्या लॉग-इनमध्ये तपास केला असता त्यातही कुठे फेरफार झाल्याचे आढळले नाही, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

परिणामी, या विद्यार्थ्याच्या अभ्यासक्रम नोंदणी अर्जात परस्पर कोणीतरी बाहेरूनच फेरफार केल्याचा निष्कर्ष या दोन्ही अहवालांमध्ये काढण्यात आला. हे अहवाल उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे पाठवण्यात आले. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी सायबर कक्षाकडे देण्याचे आदेश दिले. त्यानुसार तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयाचे सहसंचालक प्रमोद नाईक यांनी संस्थेच्या प्राचार्यांना सायबर कक्षाकडे रितसर तक्रार दाखल करण्याचे पत्र दिले आहे. तसेच कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिला नाही, असे स्पष्टीकरण नाईक यांनी दिले.