अभिषेक तेली

मुंबई : सध्या गावोगावी सुरू असलेल्या जत्रा, उत्सव आणि महाभंडाऱ्याच्या उत्साहात येऊ घातलेल्या निवडणुकांनी रंग भरले आहेत. या जत्रांपासून काहीशी फारकत घेतलेल्या मुंबईतील राजकीय कार्यकर्त्यांनी महाभंडाऱ्याचे निमित्त शोधून काढले आहे, तेही विचारवंत कार्ल मार्क्स यांच्या जयंतीचे. साम्यवाद आणि समाजवादाचे क्रांतिकारी प्रणेते कार्ल मार्क्स यांच्या २०५ व्या जन्मदिनानिमित्त शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवार, ५ मे रोजी धारावीत चक्क महाभंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

जर्मनीत जन्मलेल्या कार्ल मार्क्स या विचारवंताने समाजशास्त्र, अर्थशास्त्र आणि राजकारणाबद्दल मांडलेले सिद्धांत ‘मार्क्सवाद’ म्हणून ओळखले जातात. आजही त्यांनी मांडलेल्या सिद्धांताचे अभ्यासक हे जगभरात पसरले आहेत. एखाद्या विचारवंताच्या जयंतीनिमित्त कोणतेही व्याख्यान अथवा सामाजिक कार्यक्रम न घेता, चक्क भंडारा आयोजित करण्यात आला आहे.

हेही वाचा >>>वीजदेयक आंदोलनप्रकरण राहुल नार्वेकर, लोढांविरोधात आरोप निश्चिती

कामगार शेतकरी, कष्टकरी, बहुजन वंचित जनतेच्या मुक्तीचे तत्वज्ञान जगाला देणाऱ्या महामानवाचा जन्मदिवस साजरा करण्याकरिता महाभंडाऱ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. सामिष भोजनाची मेजवानी या महाभंडाऱ्यात आहे.शेतकरी कामगार पक्षाने आपल्या जडणघडणीच्या काळात शाहू, फुले, आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांसह मार्क्सवाद व लेनिनवादाचे आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञान स्वीकारले आहे. कार्ल मार्क्स यांनी कामगार आणि कष्टकऱ्यांबद्दल मांडलेल्या विचारांनी जगातील अनेक देशांमध्ये क्रांती घडवली.

हेही वाचा >>>बारसू आंदोलकांवरील गावबंदी आदेश मागे घेणार ; राज्य सरकारची उच्च न्यायालयात हमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपल्या देशातील महापुरुषांची जयंती आपण उत्साहात साजरी करतो. त्याप्रमाणेच कार्ल मार्क्स यांची जयंती वेगवगळे डाव्या विचारांचे पक्ष साजरे करतात. कार्ल मार्क्स हे नाव जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि सर्व वयोगटातील लोकांना एकत्र आणण्यासाठी मार्क्स यांच्या जन्मदिनानिमित्त महाभंडाऱ्याचे आयोजन केले आहे, असे शेतकरी कामगार पक्षप्रणीत विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा साम्या कोरडे हिने सांगितले.