मुंबई : महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्यातर्फे वस्ती सहभागातून शौचालयांची देखभाल दुरुस्ती केली जाते. या उपक्रमाची देशभरात दखल घेण्यात आली आहे. याअंतर्गत समावेशक आणि शाश्वत समुदाय स्वच्छतेसाठी ‘समुदाय आधारित संस्था प्रणाली’ सक्षमीकरण या विषयावर बुधवारी,२८ मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

भायखळा येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात ही कार्यशाळा होणार आहे.वस्ती पातळीवरील संस्थांना प्रशिक्षित व सक्षम बनवणे हा या कार्यशाळेचा उद्देश आहे. महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, संयुक्त राष्ट्रे बालनिधी (युनिसेफ) आणि इतर विकास भागीदार संस्था यांच्या सहयोगाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या एकदिवशीय कार्यशाळेच्या उद््घाटनाला महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी आणि अन्य संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच वस्ती पातळीवरील संस्था, विकास संस्था, शैक्षणिक संस्था, कॉर्पोरेट क्षेत्र इत्यादींचे प्रतिनिधी कार्यशाळेत सहभागी होणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महानगरपालिकेचे ‘वस्ती सहभागातून सामुदायिक शौचालयांची देखभाल-दुरूस्ती’ हे एक देशपातळीवर नावाजलेले प्रारूप आहे. त्याच्या सक्षमीकरणाचे कामकाज महानगरपालिकेने हाती घेतले आहे. याअंतर्गत धोरणात्मक, तसेच जनजागृती, वस्ती पातळीवरील संस्थांची क्षमता बांधणी, उद्योजगत विकास, विविध उपक्रमांचे अभिसरण, बहू-भागधारक सहकारी आणि अभिनव संकल्पनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, अशी माहिती उपआयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.