दहशतवादाच्या प्रकरणात अटकेत असलेल्या एका आरोपीने आईच्या निधनानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तात्पुरता जामीन मिळावा म्हणून अर्ज केला होता. मुंबई उच्च न्यायालयाने हा जामीन अर्ज फेटाळला आहे. फक्त आईबाबतच नाही तर आपल्या मातृभूमीविषयीही प्रेम असावं लागतं असं म्हणत हा अर्ज न्यायालयाने फेटाळला.
मुस्तफा मेहमुदिया असं आरोपीचं नाव
मुस्तफा मेहमुदिया असं २००७ पासून तुरुंगात असलेल्या आरोपीचं नाव आहे. औरंगाबाद आर्म्स हाऊस प्रकरणातला तो आरोपी आहे. सध्या या प्रकरणाची सुनाववणी मुंबई उच्च न्यायालयात सुरु आहे. सुरुवातीला तो माफीचा साक्षीदार झाला होता. पण नंतर त्याची नियत बदलली. त्यामुळे त्याने दिलेला शब्द फिरवला. मागील महिन्यात मुस्तफाने तात्पुरता जामीन मिळावा असा अर्ज न्यायालयापुढे केला होता. अहिल्या नगर या ठिकाणी त्याची आई वास्तव्यास होती. आईचं निधन झाल्याने मला तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तात्पुरता जामीन मिळावा असं मुस्तफाने त्याच्या जामीन अर्जात म्हटलं होतं. मुलगा म्हणून तिला अखेरचा निरोप देणं हे माझं भावनिक कर्तव्य आहे असंही त्याने म्हटलं होतं. मात्र न्यायालयाने त्याचा हा जामीन अर्ज फेटाळून लावला.
मुंबई उच्च न्यायलायाने काय म्हटलं आहे?
जर याचिकाकर्ता आरोपी मुस्तफा मेहमुदिया हा आईच्या निधनामुळे भावूक वगैरे झाला असेल तर त्याला त्याच्या मातृभूमीबाबतही तेवढंच प्रेम असायला हवं होतं. भारताची सुरक्षा हा प्रत्येसाठीचा अतिदक्षतेचा मुद्दा आहे. ज्या प्रकरणात आरोपी तुरुंगवास भोगतो आहे ते प्रकरण देशाच्या सुरक्षेशी प्रतारणा करणारंच आहे. त्यामुळे मला असं मुळीच वाटत नाही की त्याला आईच्या अंत्यसंस्कारांसाठी तात्पुरता जामीन दिला पाहिजे. विशेष न्यायाधीश चकोर एस. बावीसकर यांनी हा निकाल देत आरोपी मुस्तफाचा जामीन अर्ज फेटाळला. मुस्तफा मेहमुदियातर्फे जेव्हा मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांनी कशा पद्धतीने अंत्यसंस्कारासाठी आरोपींना संमती दिली गेली याची उदाहरणं ठेवण्यात आली तेव्हा न्यायालयाने सांगितलं की प्रत्येक प्रकरणातली तथ्य आणि त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. ही बाब विचारात घेणं गरजेचं आहे.
जुलै २०१६ मध्ये मुस्तफासह १२ जणांना ठरवण्यात आलं दोषी
जुलै २०१६ मध्ये मुस्तफा मेहमुदियासह एकूण १२ जणांना विशेष न्यायालयाने दोषी ठरवलं. या आरोपींमध्ये २६/११ च्या कटात सहभागी असणारा संशयित आरोपी झाबिउद्दीन अन्सारीचाही समावेश आहे. महाराष्ट्र ATS ने हा दावा केला की ४३ किलो आरडीएक्स, त्याचप्रमाणे एके ४७ बनावटीच्या रायफल, ३ हजार २०० जिवंत काडतुसं, ५० हातबॉम्ब हे सगळं यांच्या गाडीमधून जप्त करण्यात आल्या होत्या.