मुंबईः घाटकोपर – मानखुर्द जोड रस्त्यावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या जेसीबीने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याची घटना रविवारी घडली. त्यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. अपघातानंतर जेसीबी चालकाने दुचाकीस्वाराला वैद्यकीय मदत न करता घटनास्थळावरून पलायन केले. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी आरोपी जेसीबी चालकाविरोधात निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत झाल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. जेसीबीच्या क्रमांकावरून पोलिसांना आरोपी चालकाची माहिती मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.
रविकांत सिंह लोधी असे मृत व्यक्ती नाव आहे. अपघात झाला त्यावेळी रविकांतच्या दुचाकीवर अभय रामदास गुप्ता ऊर्फ लकी (१९) बसला होता. दोघेही चांगले मित्र असून मानखुर्द परिसरातील रहिवासी आहेत. तक्रारीनुसार रविकांत रविवारी पहाटे अभयच्या घरी गेला होता. कामानिमित्त शिवाजी नगर, बैंगनवाडी येथे जायचे असल्याचे त्याने अभयला सांगितले. त्यावेळी अभय रविकांतसोबत जाण्यास तयार झाला. तो रविकांतच्या दुचाकीवर तो मागे बसला.
दोघेही शिवाजी नगरला जाण्यासाठी निघाले. त्यांची दुचाकी घाटकोपर – मानखुर्द जोड रस्त्यावरील मोहिते पाटील नगर परिसरात पोहोचली. त्यावेळी समोरून पिवळ्या रंगाचा जेसीबी येत होतो. विरुद्ध दिशेने येणाऱ्या जेसीने त्यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली. त्यावेळी अभय दूर फेकला गेला. तर रविकांत दुसऱ्या बाजूला पडला. या अपघातात रविकांत गंभीर जखमी झाला व बेशुद्ध झाला. या अपघातानंतर जेसीबी चालकाने रविकांतला कोणतीही वैद्यकीय मदत न करता तेथून पलायन केले.
अभयही एकटाच असल्यामुळे त्याने मदतीसाठी मित्र मुकेश कश्यपला दूरध्वनी करून घडलेला प्रकार सांगितला व मदतीस येण्यास सांगितले. मुकेशने रविकांत व अभय यांच्या मदतीसाठी शफीक सिद्दीकीचा पाठवले. त्यानंतर अभय व शफीकने रविकांतला रिक्षातून घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालायत नेले. तेथील डॉक्टरांनी रविकांतची वैद्यकीय तपासणी केली. पण त्याचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
याबाबतची माहिती मिळाल्यानंतर मानखुर्द पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली. यावेळी पोलिसांनी अभयचा जबाब नोंदवला असता त्याने घडलेला प्रकार सांगितला. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात जेसीबी चालकाविरोधात भरधाव वेगाने दुचाकीला धडक देऊन मृत्यूस कारणीभूत झाल्याबाबत तसेच अपघातानंतर कोणतीही वैद्यकीय मदत न करता पलायन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी जेसीबीचा क्रमांक मिळवला असून त्या माहितीच्या आधावर पोलीस आरोपी चालकाचा शोध घेत आहेत.