मुंबई- ऑनलाईन ड्रेस खरेदी करणाऱ्या एका महिलेचा मोबाईल हॅक करून तिच्या बँक खात्यातील ९९ हजार रुपये लंपास करण्यात आले आहेत. याप्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात माहिती तंत्रज्ञान आणि फसवणुकीच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिंडोशी येथे राहणाऱ्या छाया सुर्यवंशी (४३) जानेवारी महिन्यात ड्रेस खरेदी करण्यासाठी गुगलवर शोध घेत होत्या. त्यांना प्रियांका कलेक्शन नावाचे एक संकेतस्थळ दिसले. तेथे वेगवेगळ्या प्रकारचे स्वस्त ड्रेस विक्रीसाठी उपलब्ध होते. त्यातील एक ड्रेस सूर्यवंशी यांनी निवडला. मात्र खरेदी केलेला माल घरी पैसे देण्याची सुविधा (कॅश ऑन डिलिव्हरी) नसल्याने त्यांनी १ हजार २९९ रुपये गुगल पे द्वारे भरले होते. काही वेळाने त्यांना एक मेसेज आला. त्यांनी मागवलेला ड्रेस उपलब्ध नसल्याचे (आऊट ऑफ स्टॉक) त्यांना सांगण्यात आले. त्या ड्रेससाठी भरलेल्या १ हजार २९९ रुपयांचा परतावा केला जाईल असे त्यांना सांगण्यात आले.
दुसऱ्या दिवशी सूर्यवंशी यांना एका अज्ञात मोबाईल क्रमांकावरून फोन आला. तुमचे पैसे क्रेडीट कार्डाने मी परत करणार आहे असे सांगून त्या व्यक्तीने सूर्यवंशी यांना मोबाईल मधील गुगल पे ॲप उघडायला सांगितले. त्यानुसार सूर्यवंशी यांनी आपले गुगल पे उघडले. परंतु त्यानंतर काही वेळातच एकापाठोपाठ एक बँक खात्यातील पैसे काढल्याचे संदेश त्यांना येऊ लागले. सायबर भामट्याने फिर्यादी महिलेचा मोबाईल हॅक करून त्यातील ९९ हजार रुपये काढून घेतले होते. या फसवणुकीबाबत सूर्यवंशी यांनी याबाबत सायबर मदतवाहिनीवर तक्रार दिली होती. त्यानंतर शनिवारी त्यांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६ (क) ६६(ड) आणि फसणुकीच्या कलम ३१८ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आंतरजालावर सायबर भामट्यांचे जाळे
खरेदीसाठी ऑनलाईन माध्यमाचा वापर करत असल्याने सायबऱ भामट्यांनी आंतरजालावर (इंटरनेट) आपले जाळे पसरविण्यास सुरवात केली आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक आदी समाजमाध्यमावर वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक आणि फसव्या जाहिराती केल्या जात आहेत. अनेक ग्राहकांची त्या माध्यमातून फसवणूक केली जात आहे. त्यामुळे ग्राहकांनी शक्यतो अनोळखी संकेतस्थळावरून खरेदी करू नये किंवा नामांकित कंपन्यांच्या संकेतस्थळाची खातरजमा करून घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.