राज्यातील पाणीटंचाई गंभीर; मराठवाडय़ातील धरणांनी तळ गाठला
राज्यात धरणांमध्ये केवळ १७ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, पाणी संकट अधिक तीव्र झाले आहे. मराठवाडय़ातील धरणांनी तर तळ गाठला आहे. त्यामुळे या भागातील टंचाईस्थिती अधिक गंभीर झाली आहे. राज्यात सध्या साडेतीन हजार गावे व सहा हजार वाडय़ांना साडेचार हजार टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. मान्सूनच्या आगमनापर्यंत आणखी दीड-दोन महिने कसे काढायचे, असा प्रश्न आहे.
राज्यातील सर्व प्रकारच्या जलाशयांमध्ये सध्या केवळ १७ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत २९ टक्के पाणी साठा होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा १२ टक्क्यांनी कमी झाला आहे. मराठवाडय़ात फक्त ३ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी तो ११ टक्के होता. खानदेशातील धरणांतील पाणीसाठा गेल्या वर्षी ३२ टक्के पाणी साठा होता, या वेळीविशेष प्रतिनिधी, मुंबई फक्त १५ टक्के साठा आहे.
अमरावती विभागात १७ टक्के पुणे विभागात १८ टक्के नागपूर विभागात २५ टक्के, कोकणातील धरणांमध्ये ४४ टक्के पाणीसाठी आहे.
३५८६ गाव़े, ५९९३ वाडय़ांना टँकरने पाणीपुरवठा
पाणीसाठा कमी होत असताना टँकरची संख्या मात्र वाढत आहे. सध्या ३५८६ गावे व ५९९३ वाडय़ांना ४६४६ टँकरने पाणीपुरवठा होतो.
टँकरचा संप अखेर मागे
- विहिरी आणि कूपनलिकांमधील पाण्याची विक्री करण्यासाठी परवाना देण्याचे आश्वासन देण्यात आल्यामुळे मुंबई टँकर असोसिएशनने पुकारलेला संप मंगळवारी मागे घेतला.
- खासदार किरीट सोमय्या यांनी कारवाईची मागणी केल्यानंतर पालिकेने खासगी टँकरमध्ये पाणी भरण्यात येणाऱ्या विहिरी आणि कूपनलिकांवरील पंप जप्त करण्यास सुरूवात केली होती.