मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने माघार घेतल्यानंतर या निवडणुकीत शिवसेनेसमोरील (ठाकरे गट) प्रत्यक्ष आव्हान संपले असले तरी शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांची मते वळवण्यासाठी विरोधकांकडून वेगवेगळय़ा युक्त्या केल्या जात आहेत. नोटाचे बटण दाबावे यासाठी मतदारांना आवाहन केले जात असून त्याकरिता नोटा वाटल्या जात असल्याचा आरोप शिवसेना नेते, आमदार अ‍ॅड. अनिल परब यांनी केला आहे. याप्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने पोलीस स्थानकात व निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली आहे. नोटाचे बटण दाबा असे आवाहन करणाऱ्या ध्वनिचित्रफिती आरपीआय पक्षाकडून प्रसारित केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>‘ये डर मुझे अच्छा लगा, आय…’, फलक चोरीवरून सुषमा अंधारेंची जोरदार टोलेबाजी

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीला आता केवळ एक दिवस उरला आहे. शिवसेनेचे माजी आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी येत्या ३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून अपक्षांसह सात उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत महाराष्ट्राची संस्कृती असल्याचे सांगून भाजपने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. त्यामुळे या निवडणुकीतील चुरस संपली आहे असे वाटत असतानाच आता नोटा म्हणजेच कोणताही उमेदवार नको या पर्यायाचे बटण दाबण्यासाठी काही अनोळखी व्यक्ती पैशांचे वाटप करीत असल्याचे आरोप अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. तसेच या प्रकरणी ध्वनिचित्रफिती प्रसारित केल्या जात असून त्यात आरपीआयचे कार्यकर्ते असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. एका बाजूला सहानुभूती, महाराष्ट्राची परंपरा, राजकीय संस्कृती, इतिहास याचे दाखले देत उमेदवार मागे घेतला दुसरीकडे नोटाचे बटण दाबून निषेध नोंदवण्याचे आवाहन केले जाते आहे. हा निषेध उमेदवाराचा नसून ज्या पक्षाने उमेदवारी नाकारली त्यांचा आहे असे सांगत नोटा बटण दाबण्याचे आवाहन केले जाते आहे. अशा ध्वनिचित्रफिती हाती लागल्या असून त्या पोलिसांना दिल्या असल्याचे परब यांनी सांगितले.

हेही वाचा >>> “…तर राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार येईल” घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं मोठं विधान

ज्या भागातून या पद्धतीचा नोटाचा प्रचार केला जात आहे त्या भागांचीही नावे दिली असून पोलिसांनी याप्रकरणी चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच नोटाचा पर्याय ही मतदारांची ऐच्छिक निवड असते. त्याचा असा प्रचार करता येणार नाही, हे आम्ही आयोगाच्या निदर्शनास आणून दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ही निवडणूक प्रथमच महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्यात आला असून जेवढे मतदान होईल त्याच्या ९८ टक्के मतदान ऋतुजा लटके यांना होईल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विकासासाठी पाठपुरावा करू

तीन पक्षाची मते मिळाल्यानंतरचे गणित कसे असेल याचाही अंदाज या निवडणुकीमुळे येईल, असेही ते म्हणाले. अंधेरी पूर्व हा मोठय़ा प्रमाणावर औद्योगिक विभाग असून या ठिकाणी रहिवाशांबरोबरच बाहेरून कामानिमित्त येणाऱ्या नोकरदारांच्या सोयीच्या दृष्टीने या भागाचा विकास करण्यासाठी पाठपुरावा करू, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. कामगार रुग्णालय पुन्हा सुरू करण्यासाठी विशेषत्वाने प्रयत्न केले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opponents appeal voters to press nota button in andheri east bypoll zws
First published on: 02-11-2022 at 02:44 IST