मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी, त्यांच्या जीवनाशी संबंधित महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठित स्थळांना भेट देता यावी यासाठी भारतीय रेल्वेने ‘भारत गौरव सर्किट यात्रे’चे आयोजन केले आहे. यात्रेच्या निमित्ताने इतिहासप्रेमी, पर्यटकांना गड-किल्ल्यांना भेटी देता येणार आहेत. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) सहा दिवसीय सहलीचे आयोजन केले आहे.

भारत सरकारच्या ‘देखो अपना देश’ आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमाच्या अनुषंगाने, देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी भारत गौरव टूरिस्ट ट्रेन चालवण्याकरीता पुढाकार घेतला आहे. यासाठी विशेष पर्यटन ट्रेन पॅकेज सुरू करण्यात आले आहे.आयआरसीटीसीतर्फे पर्यटन ट्रेन चालवण्यात येत आहेत.

ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्यासाठी ९ जून २०२५ रोजी सहलीचे आयोजन करण्यात येणार आहे. ही सहल ५ रात्री आणि ६ दिवसांची आहे. अत्याधुनिक भारत गौरव एसी टुरिस्ट ट्रेनमधून प्रवास प्रवास होईल. यामध्ये शयनयान, द्वितीय श्रेणी आणि तृतीय श्रेणी वातानुकूलित डबे असून यामध्ये ७४८ पर्यटकांना सामावून घेण्याची क्षमता आहे.

तीन श्रेणींमधून प्रवास

शयनयान डब्यासाठी १३,१५५ रुपये, तृतीय श्रेणी वातानुकूलित डब्यासाठी १९,८४० रुपये आणि द्वितीय श्रेणी वातानुकूलित डब्यासाठी २७,३६५ रुपये शुल्क आहे. यामध्ये जीएसटी, जेवण आणि मार्गदर्शित टूर समाविष्ट आहेत. एकटे प्रवासी इतरांबरोबर राहण्यासाठी शेअरिंग करू शकतात.