मुंबई : अंधेरी (प.) येथील लोखंडवाला बॅक रोड परिसरातील कांदळवनाची कत्तल करून बेकायदेशीर भराव टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आणि भराव हटवून कांदळवन पूर्ववत करण्याचे आदेश पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी दिले.
आमदार अनिल परब यांनी विधानपरिषदेत या परिसरातील कांदळवनाच्या कत्तलीचा मुद्दा लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला होता. त्यावेळी दिलेल्या आश्वासनानुसार मुंडे यांनी अधिवेशन संपल्यावर दुसऱ्याच दिवशी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पहाडी गोरेगाव परिसरात झालेल्या पाहणीस आमदार परब, पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (एमपीसीबी) सदस्य सचिव अविनाश ढाकणे आणि विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
नियमांचे उल्लंघन
यावेळी बफर झोनमध्ये कोणतीही परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात भराव टाकल्याचे निदर्शनास आले. प्रत्यक्ष दर्शनी नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्याचे सांगून ही जागा काही वर्षांपूर्वी ना विकास क्षेत्रामध्ये होती, ती विकास क्षेत्रात कशी आली?, असा सवाल करीत मुंडे यांनी याचा शोध घेण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.