मुंबई : प्राच्यविद्या क्षेत्रात २२१ वर्षाची संशोधन परंपरा असलेल्या फोर्टमधील ‘एशियाटिक सोसायटी’च्या शनिवारी होत असलेल्या निवडणुकीत १९ जागांसाठी ४५ उमेदवार मैदानात आहेत. विनय सहस्त्रबुद्धे गटाने सर्व १९ जागांवर तर कुमार केतकर गटाने १२ उमेदवार उभे केले आहेत. १४ उमेदवार स्वतंत्रपणे निवडणूक लढत आहेत. मतदानाला दोन दिवस बाकी असल्याने मेल, दूरध्वनी आणि व्हॉटसअपच्या मदतीने दोन्ही गटाकडून मतदारांपर्यंत पोचण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

एक अध्यक्ष, एक सचिव, चार उपाध्यक्ष, सात छाननी समिती सदस्य, सहा कार्यकारी समिती सदस्य अशा १९ जागांसाठी ४५ उमेदवार रिंगणात आहेत. ‘एशियाटिक सोसायटी’मध्ये दरवर्षी १/३ पदाधिकारी निवृत्त होतात आणि वार्षिक सर्वसाधरण सभेत रिक्त जागांच्या निवडणुका घेतल्या जातात. यावेळी १९ जागा रिक्त आहेत. सहस्त्रबुद्धे आणि केतकर गटांव्यतरिक्त १४ उमेदवार स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत. ‘राष्ट्र प्रथम मानणाऱ्या उमेदवारांना निवडून द्या’, असा सहस्त्रबुद्धे गट प्रचार करत असून ‘एशियाटिक वाचवण्यासाठी मत द्या’, असा प्रचार केतकर गट करत आहे.

३ ऑक्टोबर पर्यंत ज्यांची सभासद नोंदणी झाली आहे, ज्यांच्याकडे संस्थेने ओळखपत्र आहे व संस्थेचे शुल्क बाकी नाही, त्या सभासदांना मतदानाचा अधिकर आहे. मार्च पर्यंतचे जुने ३ हजार १२४ आणि ३ ऑक्टोबर पर्यंतचे नवे ३५५ असे ३४८० सभासद यावेळी मतदानास पात्र आहेत. विनय सहस्त्रबुद्धे आणि कुमार केतकर या भाजप व काँग्रेसच्या माजी खासदारांमध्ये अध्यक्षपदासाठी लढत होत असल्याने निवडणूक चुरशीची बनली आहे. सहस्त्रबुद्धे गटामध्ये भाजप व उजव्या विचारसरणीच्या संघटनांचे कार्यकर्ते-अभ्यासक उमेदवार आहेत. तर केतकर गटामध्ये पुरोगामी कार्यकर्ते-अभ्यासक एकवटले आहेत.

तिरंगी लढत

१. सहस्त्रबुद्धे गट : डॉ. विनय सहस्त्रबुद्धे (अध्यक्षपद), रमेश पतंगे, डॉ. संजय देशमुख, डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी, नितीश भारद्वाज, विवेक गणपुले, डॉ. प्राची मोघे, डॉ. मल्हार कुलकर्णी, माधव भांडारी, राजेश बेहरे, व्ही. एम. चक्रवर्ती, प्रमोद बापट, डॉ. माधवी नरसाळे, दत्ता पंचवाघ, अभिजीत मुळ्ये, डॉ. स्नेहा नगरकर, मल्हार गोखले, अमोल जाधव, उमंग काळे असे १९ उमेदवार आहेत.

२. केतकर गट : कुमार केतकर (अध्यक्षपद), ए.डी. सावंत, अर्जुन डांगळे, दिपक पवार, सुनिल कदम, सी. एम. पॉलसी, भारत गोठोस्कर, इब्राहिम अफगाण, डॉ. कुंदा प्र. नि., नंदिनी आत्मसिद्ध, सुनंदा भोसेकर, स्वाती दाते असे १२ उमेदवार आहेत.

३. स्वतंत्र उमेदवार : अनहिता तारापोरे, अनिल सावंत, अंजली मसरगुप्पी, देवदत्त मालशे, पंकज समेळ, अरुण शंकर, नॉबी परियरम, रेणू पारेख, शर्मिष्ठा मुखर्जी, उषा विजयालक्ष्मी, रामा बिष्णोई, रामचंद्रन व्यंकटेश, सविता सुरी, उर्वशी आस्था असे १४ उमेदवार आहेत.