मुंबई : व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणातील संधी आणि क्षमता ओळखण्यासाठी मदत व्हावी यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून ‘अटल’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत अवघ्या दीड महिन्यांत एक लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तसेच या उपक्रमांतर्गत ५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या उपक्रमाचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

शिक्षणातील संधी आणि क्षमता ओळखण्याबरोबरच विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढविण्यासाठी तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी परीक्षांचा सराव करता यावा यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत ‘अटल’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ‘अटल’ उपक्रमाअंतर्गत मॉक टेस्ट्स आणि सायकोमेट्रिक टेस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतांचा शोध घेता येतो. या सराव परीक्षांमुळे विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर त्या विषयातील शैक्षणिक संधी आणि प्रवेश परीक्षांच्या पूर्वतयारीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जाताना येणारा ताण कमी कमी होण्याबरोबरच शैक्षणिक आयुष्यात पुढे जाण्यास प्रोत्साहन मिळणार आहे. १६ जानेवारी २०२५ रोजी सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत अवघ्या दीड महिन्यांमध्ये १ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

‘अटल’ उपक्रमात राज्यातील विविध महाविद्यालयांचा सहभाग असून कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन या विद्याशाखांचा समावेश आहे. या उपक्रमाची विविध माध्यमातून प्रचार आणि प्रसिद्धी करण्यात येत आहे. आतापर्यंत १ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असली तरी ५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट आहे, असे पाटील यांनी सांगितले.

परीक्षेबरोबरच करिअरला प्रोत्साहन देणार

सायकोमेट्रिक टेस्टद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार व त्यांच्या क्षमतांनुसार योग्य शैक्षणिक आणि व्यावसायिक विषयांची निवड करण्यास मदत होईल. हा उपक्रम केवळ परीक्षा तयारीपुरते मर्यादित नसून, विद्यार्थ्यांना शैक्षणिक करिअरला प्रोत्साहन देणारा आहे, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक

‘अटल’ उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील शहरी भागाबरोबरच दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना राज्य सामाईक प्रवेश परीक्षा मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचा सराव यामुळे करणे शक्य होणार आहे. तसेच परीक्षांचे वेळापत्रक, माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.