मुंबई : पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांना मुंबईमध्ये आणण्यात येत आहे. मात्र हे सर्व जण अजूनही मानसिक तणावाखाली आहेत. त्यामुळे त्यांना यातून दिलासा देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मानसिक आरोग्य सेवा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार चारही वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये स्वतंत्र डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे, तसेच त्यांना डॉक्टरांशी संपर्क साधणे सुलभ व्हावे यासाठी डॉक्टरांचे संपर्क क्रमांकसुद्धा जाहीर करण्यात आले आहेत.
मानसोपचार कुठे?
मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज आणि बीवायएल नायर रुग्णालय, गोर्वधनदास सुंदरदास मेडिकल कॉलेज आणि केईएम रुग्णालय, लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय आणि लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालय; तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि आर. एन. कूपर रुग्णालयामध्ये मानसिक आरोग्य सेवा विविध पातळ्यांवर उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या चारही प्रमुख महापालिका रुग्णालयांमध्ये सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत समुपदेशन, तीव्र तणावाचे मूल्यमापन, ‘पीटीएसडी’ची (पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर) शक्यता, औषधोपचार आणि आवश्यकतेनुसार रुग्णालयात भरती अशा सेवा दिल्या जाणार आहेत. तणाव, निद्रानाश, अस्वस्थता, घटना पुन्हा अनुभवण्याची भावना यासाठी आपत्कालीन समुपदेशन व औषधोपचाराची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मुंबई महानगरपालिकेकडून स्षष्ट करण्यात आले आहे.
हितगूज हेल्पलाइन सज्ज
मानसिक तणावाखाली असलेल्या नागरिकांचे समुपदेशन करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने सुरू केलेली हितगूज ही हेल्पलाइनसुद्धा कार्यरत असणार आहे. ०२२-२४१३१२१२ या दूरध्वनी हेल्पलाइनचा वापर करून सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यंत तज्ज्ञ समुपदेशक मानसिक लक्षणांची तपासणी करतील व आवश्यकतेनुसार रुग्णालयात पाठवण्यात येईल.
रुग्णालयांमधील डॉक्टरांचे संपर्क
पहलगाममधील जखमी व त्यांच्या नातेवाईकांना मानसिक तणावातून बाहेर काढण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून केईएम, शीव नायर व कुपर रुग्णालयामधील विभाग प्रमुख, युनिट प्रमुखांची नियुक्ती केली. तसेच त्यांचे संपर्क क्रमांकही जाहीर केले आहेत.
नायर रुग्णालय – डॉ. हेनल शाह : ९३२३१९३५०५, डॉ. जान्हवी केदारे : ९३२२२३९९९७, डॉ. अल्का सुब्रमण्यम : ९८२०१४३२४५
केइएम रुग्णालय – डॉ. अजित नायक : ९८७०३१४८४४, डॉ. नीना सावंत : ९९३०५८३७१३, डॉ. क्रांती कदम : ९९२०९६९०८८, डॉ. शिल्पा आडारकर : ९८२०१३९१५८
लोकमान्य टिळक (सायन) रुग्णालय – डॉ. निलेश शाह : ८८७९५६४५३२, डॉ. हिना मर्चंट : ९९३०३९५६७९
कूपर रुग्णालय – डॉ . देवराज सिन्हा : ९८६९९ ८९८९४