मुंबई : घर सोडून पलायन केलेली १५ वर्षांची मुलगी दादर रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुरक्षित सापडली. अभ्यासाचा कंटाळा आला म्हणून ही मुलगी पालघरमधील घर सोडून गेली होती. तिला कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले.
पीडित मुलगी १५ वर्षांची असून मुळची बीड जिल्ह्यातील आहे. तिच्या पालकांनी तिला शिक्षणासाठी पालघर येथे राहणाऱ्या काकांकडे पाठवले होते. पालघरमधील एका शाळेत ती शिक्षण घेत होती. ती अभ्यासात सर्वसाधारण होती. तिचे काका आणि काकू तिला अभ्यास करण्यास सांगत होते. मात्र अभ्यासाचा तिला खूप कंटाळा येत होता. त्यामुळे तिने घरी पळून जाण्याच्या निर्णय घेतला. तिला बीड जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी परत जायचे होते. परंतु तिच्याकडे पैसे नव्हते. २ ऑगस्ट रोजी सकाळी ती घरातून निघाली. शाळेचा गणवेष घातला तर ओळखू येईल म्हणून तिने कपडे बदलले आणि शाळेची बॅग घेऊन निघाली. पालघरवरून लोकल ट्रेन पकडून ती दादर रेल्वे स्थानकात आली. तेथून ती ट्रेन पकडून गावी जाणार होती.
रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे सापडली
दादर स्थानकात २ ऑगस्ट रोजी सुरक्षा पथक गट ‘ब’मधील महिला रेल्वे पोलीस कर्मचारी इंगवले आणि माने या दोघी गस्त घालत होत्या. दुपारी ३ च्या सुमारास त्यांना ही मुलगी फलाटावर एकटीच बसलेली दिसली. त्यामुळे या महिला पोलिसांना संशय आला. त्यांनी या मुलीकडे चौकशी केली. परंतु ती त्यांना काहीच माहिती देत नव्हती. तेव्हा पोलिसांनी तिची बॅग तपासली. तिच्या बॅगेत शाळेची पुस्तके होती. बॅगेत पोलिसांना एक चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीत तीन मोबाइल क्रमांक लिहिले होते. पोलिसांनी त्यातील एका मोबाइल क्रमांकावर फोन केला. तो क्रमांक तिच्या पालघरमध्ये राहणाऱ्या काकांचा होता. सकाळीच मुलगी घर सोडून गेली होती. त्याबाबत पालघर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल होता.
…तर अनर्थ घडला असता
पीडीत मुलगी अजाण आहे. तिच्याकडे पैसे नव्हते. अभ्यासाचा कंटाळा आला म्हणून ती घरातून पळून गेली होती. जर ती समाजकंटकाच्या हाती लागली असती तर अनर्थ घडू शकला असता, असे रेल्वे पोलिसांनी सांगितले. आम्ही मुलीचे समुपदेशन करून तिला तिच्या काकांकडे सुपूर्द केले, असे पालघर रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनंत पराड यांनी सांगितले.
अल्पवयीन मुले पळून जाण्याची गंभीर समस्या
अल्पवयीन मुले – मुली विविध कारणांमुळे घर सोडून पळून जातात. ही एक मोठी सामाजिक समस्या बनली आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अल्पवयीन मुला – मुलींचा गांभिर्याने आणि जलद शोध घेण्यासाठी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास करण्यात येतो. राज्यातून बेपत्ता मुला – मुलींचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन मुस्कान राबविण्यात येते. या मोहिमेअंतर्गत राज्यातील ४१ हजार १९३ मुलांचा शोध घेण्यात आला होता, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात दिली होती. मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार दररोज ६ मुले घर सोडून पळून जातात. यातील ९९ टक्के मुलांना शोधून त्यांच्या पालकांकडे पाठविण्यात पोलिसांना यश आले आहे.