मुंबई : वातावरण बदलाचे संकट आणि देशांतर्गत खाद्यतेलाची मागणी पूर्तता करून अन्नसुरक्षा मजबूत करण्यासाठी बांबू लागवडी सोबत पाम लागवडीच्या पर्यायाची व्यवहार्यता तपासून धोरणात्मक निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री पर्यावरण शाश्वत विकास कृती दलाचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांनी इंडोनेशियाच्या वरिष्ठ शिष्टमंडळाला दिली.

इंडोनेशियन पाम ऑइल असोसिएशन (आयपीओए), गबुंगन पेंगुसाहा केलापा सावित इंडोनेशिया (जीएपीकेआय) यांच्या वतीने मुंबईतील ग्रँड मराठा हॉटेलमध्ये आयोजित वरिष्ठ पातळीवरील बैठकीला पटेल यांनी संबोधित केले. यावेळी आयपीओएचे अध्यक्ष एडी मार्टोनो आणि संस्थेचे परराष्ट्र व्यवहार प्रमुख डॉ. फादिल हसन, जुन कुनकोरो, नी मेड महात्मा देवी, सेरुनी रिया सियानिपार, इंडोनेशियाचे शेती आणि पूरक उद्योगांचे गुंतवणूक सल्लागार दीपक परीक आदी मान्यवर उपस्थित होते.

या उच्चस्तरीय बैठकीमध्ये भारत-इंडोनेशिया पाम तेल व्यापारातील सहकार्य मजबूत करणे, स्थिर पुरवठा सुनिश्चित करणे, पारदर्शकता आणि शाश्वतता तसेच भारताच्या खाद्यतेल धोरणाला पाठिंबा देणे तसेच भारताने इंडोनेशिया यांच्या सहकार्याने भारतात पाम लागवडीचे प्रयोग यावर चर्चा झाली. धोरणात्मक बैठकीच्या आयोजना मागील भूमिका कृषी धोरण गुंतवणूक सल्लागार दीपक परीक यांनी स्पष्ट केली.

एडी मार्टोनो म्हणाले,’ इंडोनेशियाने सध्या पाम तेलाचे बियाणे निर्यातीसाठी परवानगी दिली आहे. जवळपास एक लाख हेक्टर क्षेत्रावर काम उत्पादन होत असून २२ कंपन्यांमार्फत पाय बियाणे निर्मितीची प्रक्रिया सुरू आहे. भारताला तंत्रज्ञान देताना आम्ही भारताला स्पर्धक समजत नाही. तर धोरणात्मक भागीदार समजतो. पाम तेलामुळे आरोग्याची प्रश्न निर्माण होतात या गैरसमजला ग्राहक जागृती महत्त्वाची आहे. एकंदरीत दोन्ही देशांमध्ये व्यापार वाढीसाठी मोठ्या संधी असल्याचे मार्टानो यांनी सांगितले.’

यावेळी बोलताना पाशा पटेल म्हणाले,’ फक्त भारतातच नव्हे तर जगभरामध्ये वातावरण बदलाचे संकट दिसून येत आहे . ग्लोबल परिषदेच्या निमित्ताने युक्रेन रशियासह अनेक जगभरातील देशांची चर्चा झाली. वातावरण बदलाचा शेतीवरील परिणाम हा आता सर्वव्यापी झाल्याचे दिसून येते.’आयपीसीसीच्या माध्यमातून दिलेला इशारा गंभीर आहे, असे सांगत पाशा पटेल म्हणाले,’ २०५०पर्यंत ४५० पीपीएम कार्बन उत्सर्जन पोहोचले तर मानव जातीचे जगणे मुश्किल होईल. वाढते कार्बन उत्सर्जन तापमान वाढ आणि वातावरण बदलाचे संकट रोखण्यासाठी सर्व देशांना एकत्र येण्याची गरज आहे. इंडोनेशियामध्ये पाम तेलापासून बायोडिझेल बनवण्याचे तंत्रज्ञान भारताला आवश्यक आहे.’

बांबू आणि पाम तेलाची एकत्रित मिश्र शेती केल्यास वातावरण बदलाचे संकट रोखणे तसेच खाद्यतेलाची पूर्तता आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होण्यास मदत होईल.

बांबू पासून इथेनॉल बनवण्याची रिफायनरी नुमालीगडमध्ये ( आसाम) सुरू झाली असून, बायोमाचा वापर करून सर्व औष्णिक विद्युत प्रकल्प टप्प्याटप्प्याने कोळशाचा वापर कमी करतील.भविष्याची ऊर्जेची लढाई जैवइंधन विरोधात जीवाश्म इंधन, अशी आहे. बांबू आणि आमची मिश्र शेती या शाश्वत धोरणाला निश्चितपणे बळकटी दिली, असेही पाशा पटेल यांनी सांगितले.