मुंबई : ऑक्टोबर महिन्यात दिवाळी असून त्यावेळचे रेल्वे आरक्षण करण्यासाठी प्रवाशांची आताच लगबग सुरू आहे. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने प्रवाशांनी सकाळीच तिकीट काढण्यास सुरुवात केली. परंतु, रेल वन अॅप, आयआरसीटीसीचे संकेतस्थळ आणि अॅपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना तिकीट काढता आले नाही.
इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)च्या संकेतस्थळामध्ये रविवारी सकाळी तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना तिकीट काढणे कठीण झाले. प्रवाशांनी संकेतस्थळ सुरू केल्यावर अनेक त्रुटी येत होत्या. दिवाळीत बाहेरगावी जाण्यासाठी किंवा परतीचा प्रवास करण्यासाठी रेल्वेगाड्यांचे तिकीट काढण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, रविवारी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान आयआरसीटीसीचे संकेतस्थळ काम करत नव्हते. असाच प्रकार आयआरसीटीसीचे अॅप आणि रेल वन अॅपबाबतही घडत होता. या गोंधळामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले.
सकाळी ८ वाजल्यापासून शेकडो प्रवासी तिकीट काढण्याचा प्रयत्न करत होते. परंतु, हा प्रयत्न अयशस्वी ठरत होता. त्यानंतर सकाळी ८.२५ वाजेपर्यंत संकेतस्थळ बंद होते. त्यानंतर, सकाळी ८.२७ वाजता संकेतस्थळ पूर्ववत झाले. त्यानंतर प्रवाशांना तिकिटे काढता आली. काही दिवसांपूर्वी आयआरसीटीसीच्या संकेतस्थळात सकाळच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाला होता. तेव्हाही प्रवाशांना तिकिट काढणे अशक्य झाले होते.
आयआरसीटीसीचे संकेतस्थळ आणि अॅप हे दिल्ली येथील आयआरसीटीसीच्या मुख्यालयातून हाताळले जाते. त्यामुळे नेमकी समस्या काय झाली असेल, हे तिथून कळेल. याबाबत अधिक माहिती घेऊन, कळविण्यात येईल. – गौरव झा, समूह महाव्यवस्थापक, मुंबई पश्चिम विभाग, आयआरसीटीसी
भारतीय रेल्वेच्या क्रिस या संस्थेद्वारे रेल वन हे अॅप बनविले गेले आहे. या अॅपची देखभाल-दुरूस्ती व इतर कुठलीही तांत्रिक अडचण आल्यास त्याची माहिती क्रिस या संस्थेला दिली जाते. – डॉ. स्वप्निल निला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
मंगला एक्स्प्रेसचे तिकीट काढण्यासाठी आयआरसीटीसीचे संकेतस्थळ सुरू केले. मात्र, तांत्रिक अडचण असल्याचे दाखविण्यात येत होते. त्यामुळे आयआरसीटीसीचे अॅप चालू केले असता, त्यात देखील तिकीट काढताना समस्या येत होती. रेल वन वरही तशीच अडचण आली. सकाळी आरक्षण वेळ सुरू झाल्यापासून सुमारे अर्धा तास तिकीट काढता आले नाही. – अक्षय महापदी, रेल्वे प्रवासी
भारतीय रेल्वेने आगाऊ तिकीट आरक्षण कालावधी ६० दिवस केला आहे. त्यामुळे कोणत्याही रेल्वेगाडीचे तिकीट दोन महिने आधी काढता येते. दिवाळीला सुमारे ५०-५२ दिवस उरले आहेत. त्यामुळे दिवाळीच्या काही दिवस आधीचे तिकिटे काढण्यासाठी प्रवाशांची घाई सुरू झाली आहे.