मुंबई : अनेक वेळा तांत्रिक बिघाडामुळे वातानुकूलित लोकल रद्द करण्याची नामुष्की मध्य रेल्वेवर ओढवते. परिणामी, वातानुकूलित लोकलचे तिकीट आणि पासधारक प्रवाशांना नाईलाजाने सामान्य लोकलमधून प्रवास करावा लागतो. या पार्श्वभूमीवर भविष्यात वातानुकूलित लोकल रद्द झाल्यास त्याच दिवशी तात्काळ तिकिटांचा परतावा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

मध्य रेल्वेच्या ताफ्यात एकूण सात वातानुकूलित लोकल रेक आहेत. यापैकी सहा रेकच्या वातानुकूलित लोकल फेऱ्या धावत होत्या. तर, एका रेकची देखभाल-दुरूस्ती करण्यात येत होती. परंतु, मध्य रेल्वेवरील कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान वातानुकूलित लोकलचे पेंटोग्राफ तुटल्याने, हा रेक दुरूस्तीसाठी नेण्यात आला. त्यामुळे २४ आणि २५ जून रोजी मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकल फेऱ्यांपैकी एकूण १२ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. या फेऱ्यांऐवजी सामान्य लोकल चालवण्यात आल्या. त्यामुळे या वातानुकूलित लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. वातानुकूलित लोकलची वाट पाहत असताना, सामान्य लोकल आल्याने, अनेक प्रवासी आश्चर्यचकीत झाले. परंतु, अत्यावश्यक कामानिमित्त जाण्यासाठी, प्रवाशांना इच्छा नसताना सामान्य लोकलमधून प्रवास करावा लागला. वातानुकूलित लोकलचा पास असूनही दोन दिवस सामान्य लोकलमधून प्रवास करावा लागल्याने प्रवाशांनी प्रचंड संतप्त झाले. तसेच शनिवार, रविवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी अनेक वातानुकूलित लोकल धावत नाही. या दिवसाचा परतावा रेल्वेने देणे अपेक्षित असल्याचे मत प्रवाशांनी व्यक्त केले.

मध्य रेल्वेचे सामान्य लोकल आणि वातानुकूलित लोकलचे तिकीट दर

– मध्य रेल्वेवरील सीएसएमटी – टिटवाळा दरम्यानेच अंतर सुमारे ६५ किमी आहे. या प्रवासासाठी द्वितीय श्रेणीचे एका फेरीचे तिकीट २० रुपये, प्रथम श्रेणीचे तिकीट १०५ रुपये आणि वातानुकूलित लोकलचे तिकीट ११५ रुपये आहे. तर, मासिक पाससाठी द्वितीय श्रेणीचे ३१५ रुपये, प्रथम श्रेणीचे तिकीट १,१९५ रुपये आणि प्रथम श्रेणीचे २,२२० रुपये आहे.

– मध्य रेल्वेवरील सीएसएमटी – बदलापूर दरम्यानचे अंतर सुमारे ६८ किमी आहे. या प्रवासासाठी द्वितीय श्रेणीचे एका फेरीचे तिकीट २० रुपये, प्रथम श्रेणीचे तिकीट १०५ रुपये आणि वातानुकूलित लोकलचे तिकीट १२० रुपये आहे. तर, मासिक पासासाठी द्वितीय श्रेणीचे ३१५ रुपये, प्रथम श्रेणीचे तिकीट १,२८० रुपये आणि प्रथम श्रेणीचे २,३८५ रुपये आहे.

– मध्य रेल्वेवरील सीएसएमटी – दादर दरम्यानचे अंतर सुमारे ९ किमी आहे. या प्रवासासाठी द्वितीय श्रेणीचे एका फेरीचे तिकीट ५ रुपये, प्रथम श्रेणीचे तिकीट २५ रुपये आणि वातानुकूलित लोकलचे तिकीट ३५ रुपये आहे. तर, मासिक पासासाठी द्वितीय श्रेणीचे १०० रुपये, प्रथम श्रेणीचे तिकीट ३४५ रुपये आणि प्रथम श्रेणीचे ६२० रुपये आहे.

अनेक वेळा वातानुकूलित लोकलमुळे सामान्य लोकल विलंबाने धावतात. तसेच काही लोकल रद्द कराव्या लागतात. असे असताना वातानुकूलित लोकल चालवण्यात येते. जर वातानुकूलित लोकल चालवताना, प्रवाशांना सुविधा देणे अपेक्षित आहे. वातानुकूलित लोकलची कोणतीही फेरी रद्द होणे, ही प्रवाशांची चूक नाही. वातानुकूलित लोकलचे तिकीट काढूनही प्रवाशांना आरामदायी प्रवास मिळत नसेल. तर, ते मध्य रेल्वेचे अपयश आहे.- सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वातानुकूलित लोकलचा पास मासिक असतो. त्याद्वारे दिवसभरातील कोणत्याही वातानुकूलित लोकलमधून प्रवास करता येणे शक्य आहे. मात्र, वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या रद्द झाल्या म्हणून तिकीट किंवा पासचा परतावा देता येणार नाही.- डॉ. स्वप्निल निला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे