प्रवासी एकवटले

मुंबई : गेल्या पाच वर्षांपासून दादर-रत्नागिरी रेल्वेगाडीची सेवा बंद आहे. दादरवरून थेट रत्नागिरीला जाण्यासाठी या रेल्वेगाडीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात होता. परंतु, मध्य रेल्वेने विविध कारणांसाठी दादर-रत्नागिरीची सेवा बंद केली. त्यामुळे दादर-रत्नागिरी रेल्वेगाडी त्वरित सुरू करण्यासाठी प्रवासी एकवटले आहेत. ही रेल्वेगाडी सुरू होण्यासाठी १५ ऑगस्ट रोजीपासून लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा रेल्वे प्रवाशांनी दिला आहे.

१९९६/९७ पासून गाडी क्रमांक ५०१०३/५०१०४ रत्नागिरी-लोकमान्य टिळक टर्मिनस पॅसेंजर गाडी सुरू झाली. नंतर लोकाग्रहास्तव ती रत्नागिरी-दादर मार्गावर धावू लागली. सर्वच स्थानकांवर थांबत असल्यामुळे ती सर्वात लोकप्रिय ठरली व सर्वांच्या जीवनाचा एक भाग झाली. कोकणातील रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांतील सर्वच लहान – मोठ्या गावांतून सकाळी लवकर निघून मुंबई शहरात पोहोचून दुपारपर्यंत आपली कामे आटोपून त्याच दिवशी गावी परत जाण्यासाठी सर्वांनाच या गाडीचा मोठा आधार होता.

दादर-रत्नागिरी रेल्वेगाडी कधी बंद झाली ?

करोना काळात दादर – रत्नागिरी रेल्वेगाडी बंद केली. त्यानंतर २०२० सालच्या शून्य आधारित वेळापत्रकात वक्तशीरपणा सुधारण्यासाठी मध्य रेल्वेने ही गाडी दिव्यापर्यंतच चालवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सप्टेंबर २०२१ पासून ही गाडी दिव्यापर्यंत धावते. दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, ठाणे, पश्चिम उपनगरे, वसई, विरार, नालसोपारा, गुजरात येथे स्थायिक असणाऱ्या कोकणवासीयांना दिवा येथे जाणे-येणे त्रासदायक होत आहे.

उत्तर भारतातील रेल्वेगाड्यांना प्राधान्य

प्रवाशांकडून दादर-रत्नगिरी रेल्वेगाडीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. असे असतानाही ही रेल्वेगाडी सुरू करण्यात येत नाही. याउलट दादर-गोरखपूर, दादर-बलिया रेल्वेगाडी चालवून परप्रांतीयांसाठी रेल्वे प्रवासासाठी पर्याय उपलब्ध करण्यात येत आहेत, असा आरोप प्रवाशांनी केला.

मुंबई ते चिपळूण दैनंदिन रेल्वेगाडी सुरू करावी

गेल्या १० वर्षांपासून मुंबईतून थेट चिपळूणला जाणारी दैनंदिन रेल्वेगाडी सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. परंतु, अद्याप या मागणीची पूर्तता झालेली नाही. सीएसएमटी – चिपळूणला रेल्वेगाडी सुरू करण्याच्या मागणीसाठी १५ ऑगस्ट रोजी उपोपषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. ही रेल्वेगाडी द्वितीय श्रेणी आरक्षित, वातानुकूलित चेअर कार व सामान्य अनारक्षित डबे असणारी असावी आणि तिला दादर, ठाणे, पनवेल, पेण, नागोठणे, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामने, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड आणि अंजनी येथे थांबा द्यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.

रेल्वे प्रशासन, लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष

दादर-रत्नागिरी रेल्वेगाडी सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासन, लोकप्रतिनिधीकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतु, अद्याप या मागणीची पूर्तता झालेली नाही. रेल्वे प्रशासन उत्तर भारतातील रेल्वेगाड्या चालवण्यात व्यस्त आहे. मात्र राज्यातील प्रवाशांना सोयी-सुविधा उपलब्ध करण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे आता लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी सांगितले.