मुंबई : भरपूर सूर्यप्रकाश लाभणाऱ्या देशात राहूनही भारतीयांची तब्येत ‘अंधारात’ असल्याचं वास्तव समोर आल आहे. इंडियन कौंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) यांच्या अहवालात हा धक्कादायक निष्कर्ष नमूद करण्यात आला आहे. भारतातील सुमारे ७० टक्क्यांहून अधिक लोक व्हिटॅमिन डीच्या कमतरतेने ग्रस्त आहेत. ही कमतरता केवळ आरोग्यावर परिणाम करणारी नाही, तर ती सार्वजनिक आरोग्य धोरणांसमोरही मोठं आव्हान निर्माण करणारी आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या ग्लोबल स्टेटस रिपोर्टनुसार देखील भारत व्हिटॅमिन डीच्या कमतरतेच्या बाबतीत टॉप ५ देशांमध्ये आहे. युरोप, कॅनडा किंवा स्कँडिनेव्हियन देशांमध्ये सूर्यप्रकाश कमी असूनही, त्याठिकाणी फोर्टिफिकेशन आणि सप्लिमेंटेशनच्या माध्यमातून नागरिकांची आरोग्य स्थिती तुलनेनं अधिक संतुलित आहे. आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी यासाठी जागरुकतेच्या मोहिमा राबवण्याची गरज व्यक्त केली आहे. शाळांपासून ते कार्यस्थळांपर्यंत ‘डी फॉर डिफेन्स’ ही संकल्पना रुजवण, यासाठी पोषण तज्ज्ञ, डॉक्टर आणि सरकार यांच संयुक्त पाऊल उचलणं अत्यावश्यक ठरतय.

भारतातील ७० टक्क्यांहून अधिक लोकांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता असल्याच राष्ट्रीय पोषण सर्वेक्षण, आयसीएमआर, एम्स तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या विविध अहवालांद्वारे स्पष्ट झालं आहे. प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटका, दिल्ली, पंजाब आणि उत्तरप्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये अधिक गंभीर स्वरूपात दिसून येतो. सध्याच्या स्थितीत आरोग्य मंत्रालय आणि राज्य सरकारांनी एकत्र येऊन ही “सायलेंट हेल्थ इमर्जन्सी” म्हणून ओळखली आहे.

या सर्वेक्षणांमध्ये सहभागी असलेल्या हजारो नागरिकांमध्ये एक गोष्ट स्पष्ट दिसून आली आहे ती म्हणजे बहुतेकजण आपण ‘सूर्यप्रकाशात राहतो’ असा समज करून घेतात, पण प्रत्यक्षात कामाची वेळ, कपड्यांची निवड, प्रदूषण आणि त्वचेवर वापरले जाणारे सनब्लॉक हे व्हिटॅमिन डी संश्लेषण रोखतात. केंद्र सरकारने राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत ‘फूड फोर्टिफिकेशन’ प्रकल्प सुरू केला आहे. यामध्ये दूध, तेल, आटा इत्यादींमध्ये कृत्रिमरीत्या व्हिटॅमिन डी मिसळून जनतेपर्यंत पोहचवण्याची योजना आखली आहे. परंतु या योजनांची अंमलबजावणी अद्याप मोठ्या प्रमाणावर रुजलेली नाही.

व्हिटॅमिन डी बाबत काळजी घ्या

विशेष म्हणजे, २०२१ मध्ये प्रकाशित झालेल्या आयसीएमआर-एनआयएनच्या (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन) अहवालानुसार शहरी भागांमध्ये ही कमतरता ८२ टक्क्यांपर्यंत पोहोचली असून ग्रामीण भागांमध्येही ती ६५ टक्क्यांवर असल्याचे नमूद झाले आहे. याचा अर्थ असा की, ऊन असले तरी भारतीय शरीरात आवश्यक व्हिटॅमिन डी तयार होत नाही आणि हे चित्र गेल्या काही वर्षांत अधिकच गंभीर होत चालले आहे. भारतातील बहुतेक लोकांच्या जीवनशैलीत झालेला बदल हे या संकटामागचं मुख्य कारण मानल जात. शहरी भागांमध्ये लोक घरात, कार्यालयात किंवा वाहनांमध्ये जास्त वेळ घालवतात. त्यामुळे त्यांना थेट सूर्यप्रकाश मिळत नाही. शिवाय, त्वचेवर सनस्क्रीन लावणे, प्रदूषणामुळे सूर्यकिरणांतील पोषण तत्त्वे आणि आहारात अंडी, मासे किंवा दुग्धजन्य पदार्थांचा अभाव यामुळे व्हिटॅमिन डीचं नैसर्गिक संश्लेषण होत नाही.

हाड कमजोर होणे, सांधेदुखी, सततचा थकवा, त्वचेची समस्यांपासून ते मानसिक आरोग्यावरील परिणामांपर्यंत या कमतरतेचे विविध परिणाम दिसून येतात. अनेक संशोधन अहवाल असेही सूचित करतात की व्हिटॅमिन डीची कमतरता शरीरातील प्रतिकारशक्तीवरही परिणाम करते आणि त्यामुळे वारंवार सर्दी, फ्लू किंवा संसर्ग होण्याचा धोका वाढतो. कोविड-१९ महामारीच्या काळात व्हिटॅमिन डीचं महत्त्व आणखी अधोरेखित झालं होतं, कारण काही अभ्यासांत व्हिटॅमिन डीच्या कमी पातळीचा संसर्गजन्य आजारांवरील परिणामांशी संबंध दर्शवण्यात आला होता.

सरकारने राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत काही दूध कंपन्यांना दूध आणि अन्न फोर्टिफाय करण्यास प्रोत्साहित केलं आहे. मात्र, हे प्रयत्न व्यापक जनतेपर्यंत पोहोचले नाहीत. अनेक राज्यांमध्ये व्हिटॅमिन डीचे सप्लिमेंट्स सार्वजनिक आरोग्य केंद्रांतून मोफत देण्याचाही विचार सुरु आहे. आयसीएमआरच्या तज्ज्ञांच्या मते, रोज सकाळी किमान १५ ते ३० मिनिटे थेट सूर्यप्रकाशात राहणे आणि योग्य आहार घेणे आवश्यक आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“व्हिटॅमिन डी ही एक ‘सायलेंट डिफिशियन्सी’ आहे. ती कोणतीही स्पष्ट लक्षणं न देता शरीराला आतून हळूहळू नुकसान पोहोचवते. त्यामुळे दरवर्षी रक्तातील २५(ओएच)डी पातळी तपासणं गरजेचं आहे, अस डॉक्टरांचे म्हणणे आहे. आपल्या शरीरातील व्हिटॅमिन डी ची पातळी तपासण आता फॅन्सी ट्रेंड नसून एक अत्यावश्यक आरोग्य तपासणी ठरू लागली आहे. भारतासारख्या देशात सूर्यकिरणांची कमतरता नाही, पण त्याचा योग्य वापर करण्यात आपण चुकतो आहोत. त्यामुळे गरज आहे ती एक सामूहिक जागरूकतेची – जिच्या साहाय्याने आपण आरोग्याचा हा ‘डी फॅक्टर’ मजबूत करू शकू असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.