मुंबई : वाढवण बंदर विकासासाठी लागणाऱ्या बहुतेक परवानग्या मिळाल्या आहेत. इतर परवानग्या ३१ जुलैपर्यंत मिळतील, अशा विश्वास जेएनपीएचे मावळते अध्यक्ष संजय सेठी यांनी व्यक्त केला.

‘लोकसत्ता’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘पोर्ट्स कॉन्क्लेव्ह’मधील ‘भविष्यातील क्षितिजे : महाराष्ट्रातील बंदरेकेंद्रीत औद्योगिकीकरण’ या परिसंवादात ते बोलत होते. वाढवण बंदर व जेपीएनए हे मुंबई महानगर प्रदेशातील उद्योगांना चालना देणारे ठरेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

हेही वाचा >>> वाढवण बंदरामुळे विकासाला चालना; केंद्रीय बंदर विकासमंत्री सर्बानंद सोनोवाल यांचा विश्वास

बंदरांच्या क्षेत्रातील भविष्यातील प्रगतीचा सेठी यांनी आढावा घेतला. देशात विशेष आर्थिक क्षेत्राचा प्रयोग यशस्वी झालेला नाही. मात्र जेएनपीटीमधील २७७ हेक्टर क्षेत्रात राबविण्यात आलेला विशेष आर्थिक क्षेत्राचा  (एसईझेड) प्रयोग यशस्वी झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. कमी किमतीत उद्योजकांना माल निर्यात करता येत आहे. बंदरांच्या विकासाबरोबरच राज्यात जालना व वर्धा येथे ड्राय पोर्ट विकसित केली जात आहेत, असे ते म्हणाले.

पायाभूत सुविधांचा विकास महत्त्वाचा- अन्शूल सिंघल

देशाला औद्योगिक विकास आणि प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करीत असताना बंदरे, रस्ते, विमानतळ, पायाभूत सुविधा अशा महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये विकासाचे उद्दिष्ट साध्य करणे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने केंद्र सरकारने सागरमाला, बंदरविकास अशा प्रकल्पांची आखणी केली आहे, असे ‘वेलस्पून वन लॉजिस्टिक पार्कस’चे व्यवस्थापकीय संचालक अन्शूल सिंघल यांनी नमूद केले.

मोठी बंदरे विकसित करावीत – शर्मिला अमिन

वाढवण, जेएनपीटी, हजीरासारख्या बंदरांकडून मोठया अपेक्षा असून सरकारने मोठी बंदरे विकसित करावीत आणि त्यासाठी खासगी क्षेत्राचेही सहकार्य घ्यावे, असे प्रतिपादन ‘बर्टिलग लॉजिस्टिक्स’च्या व्यवस्थापकीय संचालिका शर्मिला अमीन यांनी केले. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आणि रत्नागिरी जिल्ह्यात नाणार येथे तेलशुध्दीकरण (रिफायनरी) प्रकल्प होऊ शकला नाही. गुजरातने मुंद्रा बंदर विकसित केले, रिफायनरी सुरू केल्या. रिफायनरी प्रकल्पातील अंतिम शेष घटकातून (रेसिडय़ू) वीजनिर्मितीही केली जात आहे याकडे अमीन यांनी लक्ष वेधले.

हेही वाचा >>> रत्नागिरीत क्रूझ टर्मिनल, भाईंदर-वसईदरम्यान रो-रो सेवा; महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गुरसळ यांची घोषणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बंदरामुळे सर्वसामान्य माणूस ते उद्योजकांचा विकास – कामत बंदरामुळे आजूबाजूचा बांधकाम व्यवसाय, पर्यटन, इतर छोटया मोठया उद्योगांचा विकास होत असल्याने बंदर विकास महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन सीआयआयचे राज्य उपाध्यक्ष व कामत हॉटेलचे मुख्य कार्यकारी आधिकारी विशाल कामत यांनी केले. ताज हे पंचतारांकित हॉटेल मुंबईत बंदर असल्याने होऊ शकले. बंदर विकासाबरोबर पायाभूत सुविधांची गरज आहे. बंदरामुळे सर्वसामान्य माणूस ते उद्योजकांचा विकास होतो, असे ते म्हणाले. ‘इंडियन एक्स्पेस’चे वरिष्ठ सहाय्यक संपादक सुकल्प शर्मा यांनी या चर्चासत्राचे सूत्रसंचालन केले.