आयंबिल तपानिमित्त मुंबई, पुणे, नाशिक येथील जैन मंदिरांमध्ये उपवासाचा प्रसाद तयार करण्यास उच्च न्यायालयाने शुक्रवारी परवानगी दिली. मात्र हा प्रसाद घेण्यासाठी भाविकांना मंदिरात प्रवेश देण्याऐवजी जैन धर्मीयांना तो स्वयंसेवकांमार्फत घरपोच पाठवावा, असे निर्देश न्यायालयाने मंदिर व्यवस्थापनाला दिले आहेत.
न्यायमूर्ती सुरेश गुप्ते आणि न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने प्रत्येक मंदिरातून केवळ सात स्वयंसेवकांनाच प्रसाद घरपोच करण्यास मुभा दिली आहे. तसेच त्यांची नावे व तपशील स्थानिक पोलिसांकडे जमा करण्याचे निर्देशही न्यायालयाने मंदिर व्यवस्थापनांना दिले.
आयंबिल तपानिमित्त १९ ते २७ एप्रिलदरम्यान जैन मंदिरात प्रसादाची पाकिटे घेण्यासाठी मंदिरात जाण्यास परवानगी देण्याची मागणी जैन धर्मीयांच्या दोन ट्रस्टतर्फे करण्यात आली होती. मात्र राज्य सरकारतर्फे त्याला विरोध करण्यात आला होता, तर न्यायालयाने या प्रकरणी तोडगा शोधण्याचे आदेश दिले होते.
या प्रकरणी शुक्रवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी या नऊ दिवसांत मंदिराच्या आवारातून जैन धर्मीयांना या प्रसादाची पाकिटे घेऊन जाण्यास परवानगी देण्याच्या मागणीचा याचिकाकत्र्यांतर्फे पुनरुच्चार केला. न्यायालयाने मात्र राज्यातील सद्य:स्थिती लक्षात घेता राज्य सरकारचा विरोध योग्य असल्याचे म्हटले. तसेच मुंबई, पुणे, नाशिक येथील जैन मंदिरांमध्ये उपवासाचा प्रसाद बनवण्यास परवानगी देतानाच हा प्रसाद जैन धर्मीयांना स्वयंसेवकांमार्फत घरपोच करण्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.