मुंबई : उच्च न्यायालयाने कबुतरांना खाद्य घालण्यास मनाई केली आहे. मात्र असे असले तरी कबुतरांना धान्य खाऊ घालण्याच्या घटना घडतच आहेत. गिरगाव चौपाटी येथे एका व्यक्तीने तब्बल दहा गोण्या भरून धान्य घातल्याची घटना उघडकीस आली आहे. या व्यक्तीने स्वत:च ध्वनिचित्रफित तयार करून समाजमाध्यमांवर टाकली आहे.
कबुतरांना खाद्य घालण्यावरून सध्या मुंबईतील वातावरण तापले आहे. कबुतरखाने बंद करण्यासाठी मुंबई महापालिकेने तत्काळ मोहीम राबवावी, असे निर्देश राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात दिले होते. त्यानंतर मुंबई महापालिकेने दुसऱ्याच दिवशी दादरच्या सुप्रसिद्ध कबुतरखान्यावर कारवाई केली होती. कबुतरखान्यावरील अनधिकृत बांधकाम हटवले, तसेच कबुतरांसाठी जमा केलेले खाद्यही हटवले.
पालिकेच्या या कारवाईच्या विरोधात काही पक्षीप्रेमींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालायने कबुतरांना खाद्य घालण्यास मनाई केली होती. तसेच खाद्य देणाऱ्यांविरोधात कारवाई करताना पालिकेच्या पथकाच्या कामात अडथळा आणणाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले होते. त्यामुळे जैन समाजात प्रचंड नाराजी निर्माण झाली होती.
अखेर पर्यायी व्यवस्था होत नाही तोपर्यंत नियंत्रित पद्धतीने खाद्य देण्यात यावे व कबुतरखाना बंद करू नये, असे निर्देश राज्य सरकारने दिले होते. त्यामुळे जैन समुदायाने आक्रमक होत दादरच्या कबुतरखान्यावरील ताडपत्री फाडून टाकली होती. तर दुसरीकडे गिरगाव चौपाटीवर एक जैन समुदायाच्या व्यक्तीने कबुतरांना तब्बल दहा गोण्या धान्य घातल्याची घटना उघडकीस आली आहे.
७ ऑगस्टची ध्वनिचित्रफित
गिरगाव चौपाटीवर तब्बल दहा गोण्या धान्य कबुतरांसाठी देतानाची ध्वनिचित्रफित एका व्यक्तीने स्वतःच तयार करून समाज माध्यमांवर प्रसारित केली आहे. कबुतरांना गेल्या पाच सहा दिवसांपासून धान्य मिळू शकले नाही. त्यामुळे आपण त्यांना धान्य घालते. ‘साथी हात बढाओ फाऊंडेशन’तर्फे मुंबईत रोज ३०० किलो धान्य येते, असे त्याने ध्वनिचित्रफितीत नमुद केले आहे. शांतीनाथ भगवान की जय असे, महावीर स्वामी की जय, जय जिनेंद्र, असे तो या ध्वनिचित्रफितीत म्हणतो आहे. मोठ्या संख्येने कबुतरांचे थवे गिरगाव चौपाटीवर धान्य खाण्यासाठी जमल्याचे ध्वनिचित्रफीतीत दिसत आहे.
याबाबत पालिकेच्या डी विभागाचे सहाय्यक आयुक्त मनीष वळंजू यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ७ ऑगस्ट रोजी पहाटे ही व्यक्ती चौपाटीवर येऊन धान्य घालून गेली. आम्ही या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करू. मात्र सध्या चौपाटीवर महापालिकेचे कर्मचारी आणि पोलीस पथक तेथे तैनात करण्यात आले आहे.
खाद्य घालणाऱ्यांना पाचशे रुपये दंड
रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी प्राणी – पक्षांना खाऊ घालणाऱ्यावर दंडात्मक कारवाईची तरतूद मुंबई महापालिकेच्या घनकचरा कायद्यातील स्वच्छता व आरोग्य उपविधीच्या नियमावलीत आधीपासून आहे. त्यात कबुतरांना सार्वजनिक ठिकाणी खाद्य घालणाऱ्यांकडून पाचशे रुपये दंड वसूल करण्याची तरतूद आहे. कबुतरांना खाद्य घालणाऱ्यांना दंड करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून मुंबई महापालिकेने विविध ठिकाणी पथके तैनात केली आहेत. मात्र नवनवीन ठिकाणी धान्य घालणाऱ्यांना आळा घालणे पालिकेच्या आवाक्यापलिकडे आहे.