मुंबई : नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबईत येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच आपल्या खात्याच्या प्रकल्पांचे उद्घाटन व्हावे यासाठी मंत्र्यांची धडपड सुरू आहे. कार्यक्रमपत्रिकेत कौशल्याने स्थान मिळवलेल्या मंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काय भेट द्यावी असा प्रश्न पडला आणि कोणताच पर्याय योग्यतेचा न वाटल्याने त्यांनी पृथ्वी भेट देण्याचा निर्णय घेतला. मात्र योग्य मापाची पृथ्वीची प्रतिकृती सापडत नसल्याने पृथ्वी शोधण्यासाठी या मंत्र्यांचे संपूर्ण कार्यालयच कामाला लागले होते, अखेर सोमवारी सायंकाळी उशीरा पृथ्वी सापडल्याने कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी मुंबईत येणार असल्याने राज्य सरकार कामाला लागले आहे. अनेक मंत्र्यांनी त्यांच्या विविध प्रकल्पांचे ऑनलाईनच्या माध्यमातून उद्घाटन करण्याचा घाट घातला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट देण्यासाठी मंत्र्यांकडून विविध युक्ती लढविण्यात येत आहेत. एका मंत्र्यांनी पंतप्रधानांना एक अनोखी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या विभागाचे आणि कौशल्य दाखवून ‘पृथ्वी’च भेट देण्याचे ठरवले. त्या पृथ्वीसमोर शक्तीशाली नेत्यांच्या प्रतिमा उभ्या राहणार आहेत. त्या प्रतिमांची उंची १८ इंच असल्यामुळे पृथ्वीची प्रतिकृती २४ इंच व्यासाचीच हवी होती. त्यामुळे मात्र २४ इंच व्यासाचा पृथ्वीचा गोल शोधण्याचे फर्मान मंत्री महोदयांनी सोडले आणि मंत्र्यांच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. हवा तसा पृथ्वीचा गोल मिळवेपर्यंत अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. अखेर रात्री उशीरा २४ इंच व्यासाचा पृथ्वीचा गोल सापडल्याने मंत्र्यातील कर्मचारी व अधिकारी यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
कशी असणार आहे प्रतिकृती
पंतप्रधानांचे जगातील महत्त्वाच्या नेत्यांमधील स्थान अधोरेखित करणारी ही प्रतिकृती आहे. पंतप्रधानांना देण्यात येणाऱ्या पृथ्वीच्या प्रतिकृतीसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगातील नऊ शक्तीशाली नेत्यांच्या प्रतिमा असणार आहेत. यातून जगातील शक्तीशाली नेतृत्वाची झलक दाखविण्यात येणार असून, त्यामध्ये भारताचे वाढते सामर्थ्य अधोरेखित करण्यात येणार आहे.