मुंबई : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात फरारी आर्थिक गुन्हेगार आणि उद्योगपती नीरव मोदी याचा मेहुणा मयंक मेहता हा माफीचा साक्षीदार झाला आहे. नीरव मोदीविरुद्धच्या खटल्यात माफीचा साक्षीदार करण्याची मेहता याची विनंती विशेष न्यायालयाने नुकतीच मान्य केली. तसेच, मेहता याला शिक्षेत माफीही दिली.

मेहता याने माफीचा साक्षीदार होण्यासाठी आणि शिक्षा माफीसाठी केलेला अर्ज विशेष सीबीआय न्यायाधीश ए. व्ही. गुजराती यांनी मान्य केला. गुन्ह्याशी संबंधित संपूर्ण तपशील आणि प्रत्येक व्यक्तीचा पूर्ण आणि खरी माहिती देण्याची अट न्यायालयाने मेहता याचा अर्ज मान्य करताना त्याला घातली आहे.

न्यायालयाकडून शिक्षामाफी मिळाल्यानंतर, मेहता हा आता नीरव मोदीविरुद्धच्या खटल्यात माफीचा साक्षीदार असणार आहे. मेहता, हा ब्रिटिश नागरिक आहे आणि ३५ वर्षांपासून हाँगकाँगमध्ये वास्तव्यास आहे. त्याचप्रमाणे, सीबीआयने त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम १२०-ब (गुन्हेगारी कट), ४२० (फसवणूक), ४०९ (गुन्हेगारी विश्वासघात) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या आधारे दाखल केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात आपल्याला आधीच माफीचा साक्षीदार करण्यात आले आहे आणि माफी देण्यात आली आहे. त्यामुळे, या प्रकरणातही आपल्याला माफीचा साक्षीदार करून माफी देण्याची मागणी मेहता याने विशेष सीबीआय न्यायालयाकडे केली होती.

या प्रकरणी दाखल कार्यवाहीत सहकार्य करण्यासाठी आपण सप्टेंबर २०२१ मध्ये स्वेच्छेने भारतात आलो. मेहता याने या प्रकरणी सरकारी पक्ष आणि केंद्र सरकारला अनेक पैलूंमध्ये मदत केल्याचा दावा केला होता. तसेच, माफीचा साक्षीदार केल्यास गुन्ह्याशी संबंधित संपूर्ण माहिती देण्याची हमी दिली होती. सीबीआयनेही मेहता यांच्या अर्जाला विरोध केला नाही.