मुंबई : ‘तिची कविता’ अशी काही वेगळी असते का? तिच्या जाणिवा, तिच्या संवेदना, भवतालाबद्दलचे तिचे निरीक्षण, काही पाहिलेल्या, काही अनुभवलेल्या व्यथा-वेदनांतून तिचे प्रकट होत जाणे इतरांपेक्षा वेगळे का असते? तिच्या कविता, तिच्याचकडून ऐकून याची अनुभूती घेण्याची संधी ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’च्या एका खास कार्यक्रमातून मिळणार आहे. समकालीन म्हणता येतील अशा मात्र भिन्न परिस्थिती, विचार, स्वभाव घेऊन आलेल्या चार प्रतिभावंत कवयित्रींच्या कवितांची मैफल ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’च्या मंचावर रंगणार आहे.
मराठी साहित्य, विविधांगी कला, संस्कृतीच्या ऐश्वर्याचा सौंदर्यसोहळा ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’ या अभिनव कार्यक्रमांतर्गत अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. येत्या ३० ऑक्टोबरपासून प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर प्रांगण, कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिर, पार्ल्यातील लोकमान्य सेवा संघ, ठाण्यातील गडकरी रंगायतन आणि डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’चे आयोजन करण्यात आले आहे. अभिजात साहित्य, कलासंस्कृतीचा नव्या जाणीवनेणिवेतून वेध घेत सादर होणारे विशेष प्रयोग हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरणार आहे. याच वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांचा भाग म्हणून मराठीतील नामवंत कवयित्रींची ‘तिची कविता’ या काव्यमैफलीचे आयोजन लिटफेस्टमध्ये करण्यात आले आहे. कोणी स्त्रीवादी, कोणी परखड भाष्य करणारी, कोणी कॅनव्हासवरच्या रंगातही रंगून जाणारी, कोणी कथालेखनातूनही कल्पना-वास्तवाचे खेळ रंगवणारी अशा बहुआयामी चार कवयित्री आणि त्यांच्या कवितांचा अनुभव या काव्यमैफलीत घेता येणार आहे. या मैफलीत कवयित्री नीरजा, डॉ. सिसिलिया कार्व्हालो, प्रज्ञा दया पवार आणि डॉ. मीनाक्षी पाटील आपल्या कविता सादर करणार आहेत. या अशा विशेष कार्यक्रम, कार्यशाळा, परिसंवाद, काही विशेष प्रयोगांसह कला-साहित्य-संस्कृतीचा मौलिक खजिना घेऊन येणाऱ्या ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’चे अधिक तपशील येत्या काही दिवसांत ‘लोकसत्ता’मधून वाचता येतील.
‘पारलैंगिकांची अभिव्यक्ती’…
पारलैंगिकांचे (एलजीबीटीक्यू) जगणे हा आजही आपल्याकडे अवघड विषय. सहजपणे सगळ्यांमध्ये सामावून जाणे म्हणजे त्यांच्यासाठी रोजची लढाई. समाजाने त्यांना माणूस म्हणून त्यांच्या अस्तित्वासह स्वीकारावे हा जसा त्यांचा लढा… तसेच मूलभूत गरजांसाठीही कायदेशीर मान्यता मिळावी यासाठीही त्यांचा संघर्ष सुरूच आहे. त्यांच्या या रोजच्या संघर्षाचे, त्यांच्या प्रवासाचे अनुभव ‘पारलैंगिकांची अभिव्यक्ती’ या विशेष चर्चासत्रातून ऐकता येणार आहेत. या सत्रात नक्षत्र बागवे, प्रीशा, जमिनी बाविस्कर यांच्याबरोबरच अशा मुलांच्या पालकांचे मनोगत व्यक्त करण्यासाठी अरुणा देसाई सहभाग घेणार आहेत.
