मुंबई: मोटरगाडीतून सात जण रायफल घेऊन जात असल्याचा मुंबई पोलिसांना दूरध्वनी आला. तपासणीत त्यात तथ्य नसल्याचे निष्पन्न झाले असून पोलीस  नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत.

भारत व न्यूझीलंडमधील उपात्यफेरीच्या सामन्यापूर्वी धमकीचे ट्वीट प्राप्त झाल्याची घटना ताजी असताना आता मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आणखी एक खोटी माहिती देणारा दूरध्वनी आला आहे. बुधवारी दुपारी हा दूरध्वनी आला होता. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने मोटरगाडीचा क्रमांक देऊन त्यातून  सात व्यक्ती प्रवास करत असून ते कांदिवली शंकर लेन येथून दक्षिणेकडे गेले आहेत.  त्यांच्याकडे शस्त्रास्त्र आहेत, रायफल आहे, असे सांगून त्या व्यक्तीने दूरध्वनी बंद केला. त्यांनतर याबाबतची माहित संबंधित पोलीस ठाणे व गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याना देण्यात आली. त्यांनी संबंधित मोटरगाडी शोधली असून त्यात एक कुटुंब प्रवास करत होते. तसेच कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. आता दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने अशी खोटी माहिती का दिली याबाबत तपास सुरू असून दूरध्वनी करणआऱ्या व्यक्तीला शोध सुरू आहे.

हेही वाचा >>>वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा आणि महाविद्यालये वाढणार; राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचा निर्णय

गेल्या वर्षभरात मुंबई पोलिसांना धमकी व खोटी माहिती देणारे किमान शंभरहून अधिक संदेश अथवा दूरध्वनी प्राप्त झाले आहेत. याबाबत अधिकाऱ्याने सांगितले की, अशा प्रकरणांकडे कानाडोळाही करता येत नाही. त्यामुळे सर्व प्रकरणांची तपासणी करण्यात येते. त्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लागते. खूप प्रयत्न करूनही धमकी अथवा संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीला अटकही होते. अशा प्रकरणांसाठी विशेष कायदा नाही. परिणामी, अशा प्रकरणांमध्ये आरोपीला लवकर जामीन मिळतो. त्यामुळे याप्रकरणासाठी कठोर कायदा करण्याची आवश्यकता असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

पोलिसांना सुरक्षा, बंदोबस्त, तपास कामासह अशा अफवांनाही नेहमी सामोरे जावे लागते. विशेष म्हणजे नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर अनेक मिसकॉलही येत असतात. ते नेमके कोणाकडून आले, हे पडताळण्यासाठी त्यांवर पुन्हा दूरध्वनी केल्यावरही अजब उत्तरे ऐकायला मिळतात. अनेक जण दूरध्वनी सुरू आहेत का, याची खात्री करण्यासाठी दूरध्वनी करतात. वैयक्तीक वाद, आर्थिक वाद, प्रेमप्रकरणे यातून एकमेकांना अडवकण्यासाठीही दूरध्वनी करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीनंतही पोलिसांना नियमित येणाऱ्या सर्व दूरध्वनींची पडताळणी करावी लागते. प्रश्न सुरक्षेचा असल्यामुळे त्याबाबतीत कोणताही धोका पत्करू शकत नाही. त्यामुळे तपासासोबत सुरक्षा यंत्रणांना अशा अफवांशीही दोन हात करावे लागतात. त्यामुळे या अफवा पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.