मुंबई : युएईचा बनावट व्हिसा तयार करून परदेशात प्रवास करणार्या एका इसमाला सहार पोलिसांनी अटक केली. त्याने पाच वर्षापूर्वी कॅनडाचा बनावट व्हिसा तयार केला होता. तपासणीदरम्यान या व्हिसाकडे अधिकाऱ्याचे लक्ष गेले आणि त्यामुळे तो पकडला गेला.

सारीफुल मंडल हा प्रवासी आबुधाबी येथून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. इमिग्रेशन अधिकारी गणेश गवळी (४२) त्याची कागदपत्रे तपासत होते. त्याच्या पारपत्रामध्ये (पासपोर्ट) त्यांना कॅनडाचा व्हिसा दिसला. या व्हिसाचे बारकाईने निरीक्षण केले असता तो बनावट असल्याचा संशय आला. सारीफुल याला विंग प्रमुख अर्जुन बाबू यांच्याकडे हजर केले. अधिक चौकशीत हा व्हिसा बनावट असल्याचे आढळून आले. व्हिसावर कुठल्याची प्रकारचे सुरक्षेचे फिचर आणि हॉलोग्राम नव्हते, तसेच व्हिसा स्टीकरही कलर कॉपी होती. त्याने २०२० मध्ये उत्तराखंड येथील एका दलालाकडून कॅनडाचा बनावट व्हिसा बनवून घेतला होता.

मात्र त्या एजंटने त्याला कॅनडात पाठवले नव्हते. त्यानंतर त्याने युएईचा बनावट व्हिसा तयार केला. त्याआधारे मे २०२५ मध्ये तो कोलकात्याहून युएईला गेला होता. युएईचा व्हिसा बनावट असला तरी त्याचा कुणाला संशय आला नाही. मात्र तपासणीदरम्यान पाच वर्षांपूर्वीच्या कॅनडाचा बनावट व्हिसा आढळून आला आणि त्याचे बिंग फुटले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सारीफुल याला पुढील कारवाईसाठी सहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सहार पोलिसांनी सारिफुलविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (९४), ३३६ (२), ३४० (२) आणि पारपत्र अधिनिय १९६७ च्या कलम १२ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.