मुंबई : बारसू येथे प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्पाविरोधातील आंदोलकांवर पोलीसबळाचा वापर केला जाणार नाही. तसेच शेतकऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय आणि त्यांच्या सर्व शंकांचे निरसन झाल्याशिवाय हा प्रकल्प पुढे रेटणार नाही, असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोमवारी दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बारसू प्रकल्पाच्या संदर्भात सामंत यांनी शरद पवार यांची भेट घेऊन शासनाची भूमिका मांडली. बारसू आंदोलकांनी रविवारी शरद पवार यांची भेट घेऊन वस्तुस्थिती मांडली होती. त्या वेळी पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री सामंत यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता सामंत यांनी पवारांची भेट घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार सामंत यांनी पवार यांची त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी भेट घेतली. या वेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. बारसू तेलशुद्धीकरण प्रकल्पासंदर्भात आंदोलकांच्या मनात काही गैरसमज वा शंका आहेत. त्यांचे  निरसन झाल्याशिवाय हा प्रकल्प पुढे रेटला जाणार नाही, असे आश्वासन शासनाच्या वतीने आपण शरद पवार यांना दिले. मुख्यमंत्री शिंदे यांचा संदेश घेऊनच आपण पवारांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या मनात काही शंका आहेत. त्या कशा दूर करता येतील याबाबत पवारांशी सविस्तर चर्चा झाली. शेतकऱ्यांवर अन्याय करून हा प्रकल्प पुढे रेटला जाणार नाही, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police force will not be used against protesters in barsu says uday samant to sharad pawar zws
First published on: 02-05-2023 at 02:13 IST