मुंबई: मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या एका पार्लरवर शुक्रवारी पोलीस उपायुक्त कार्यालयामधील एका पथकाने छापा घातला. येथून दोन मुलींची सुटका करण्यात आली असून पार्लर चालवणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

शीव – पनवेल महामार्गावरील देवनार परिसरात मारिया स्पा नावाचे पार्लर आहे. गेल्या काही दिवसांपासून येथे मासाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ ६ कार्यालयाला मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपायुक्त पथकाने शुक्रवारी सायंकाळी पार्लरवर छापा घातला. यावेळी तेथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे उघडकीस आले. वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या एका महिलेसह दोघांविरोधात गोवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. यावेळी पार्लरमधून दोन मुलींची सुटका करण्यात आली.