मुंबई : प्रवासादरम्यान रिक्षात विसरलेले पाच लाख रुपये किंमतीचे दागिने आरसीएफ पोलिसांनी अवघ्या चार तासांमध्ये तपास करून वृद्ध महिलेला परत मिळवून दिले. यामुळे आरसीएफ पोलिसांचे कौतुक होत आहे.
चेंबूरच्या वाशी नाका परिसरात वास्तव्यास असलेल्या लक्ष्मी चौधरी (६१) या सोमवारी रात्री रिक्षाने घरी जात होत्या. घरी पोहचल्यानंतर आपल्या हातातील एक बॅग रिक्षात विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामध्ये पाच लाख रुपये किमतीचे दागिने आणि रोख १८ हजार रुपये रक्कम असा ऐवज होता. त्यामुळे तिने तत्काळ आरसीएफ पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण मांढरे यांनी तत्काळ तपासाला सुरुवात केली.
पोलिसांनी परिसरातील काही सीसी टीव्ही कॅमेरातील चित्रणाची तपासणी केली. मात्र त्यामध्ये रिक्षाचा क्रमांक स्पष्ट दिसत नव्हता. त्यामुळे आठ ते दहा रिक्षा पोलिसांनी शोधून काढल्या. पोलिसांना यापैकी एका रिक्षांमध्ये दागिने सापडले. तात्काळ त्यांनी ते लक्ष्मी यांना परत केले.