मुंबई : धारावी येथे वादातून एका तरुणाच्या गळ्यावर चाकूने वार केल्यानंतर आरोपीने पळ काढला. पोलिसांचा ससेमिचार चकुण्यासाठी तो काळजी घेत होता. मोबाइल वापरत नव्हता, घरच्यांशी संपर्क साधत नव्हता, असे असतानाही धारावी पोलिसांनी इन्स्टाग्रामवरच्या माध्यमातून हनीट्रॅप रचला आणि आरोपी अलगद पोलिसांच्या गाळ्यात सापडला.

शुभम कोरी (१९) असे आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल होता. धारावीत राहणाऱ्या शुभमचा एका तरुणाशी वाद झाला होता. शुभमने त्या तरुणाच्या गळ्यावर चाकूने वार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर शुभम पसार झाला. धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक राजा बिडकर, निरीक्षक अशोक उगले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विकास शेलार व त्यांच्या पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. त्याच्या अटकेसाठी विशेष पथकही बनवण्यात आले. पण शुभमही पोलिसांचा समेमिरा चुकवण्यासाठी काळजी घेत होता. आपली माहिती कोणालाही मिळू नये यासाठी शुभम मोबाइल वापरत नव्हता. तसेच त्याचे कुटुंबिय व मित्रांसोबत त्याने संपर्क तोडला होता. आरोपी नेमका कोणे आहे याची कोणतीही माहिती पोलिसांना मिळत नव्हती. त्यामुळे त्याचा शोध घेणे कठीण बनले होते.

असा अडकला जाळ्यात

पोलीस आरोपीची माहिती मिळवत असतानाच तो समाज माध्यमांवर सक्रिय होता. तो इन्स्टाग्रामचा नियमित वापर करीत होता. ही माहिती पोलीस पथकाला मिळाली. पोलिसांनी एक नामी शक्कल लढवली. आरोपीचा ठाव ठिकाणा समाजमाध्यमांद्वारेच शोधून काढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पोलिसांनी तरुणीच्या नावे इन्स्टाग्राम खाते बनवून शुभमला मैत्रीची विनंती पाठवली. काही वेळाने शुभम इन्स्टाग्रामवर आला व त्याने या तरूणीची मैत्रीची विनंती स्वीकारली. त्यानंतर त्यांच्यात चॅटींग सुरू झाले. पोलिसांनी त्यांच्यासोबत तरुणी बोलत असल्याचे भासवून शुभमला आपल्या जाळ्यात ओढले. तेव्हा तो नाशिकमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळताच पोलीस तात्काळ नाशिकमध्ये रवाना झाले. तेथील अंबड पोलीसांच्या मदतीने आरोपीचा शोध घेण्यात आला. त्यावेळी तेथील सिडको कॉलनीत शुभमला सापडला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आजारी असल्यामुळे रुग्णालयात दाखल

शुभमला लहानपणापासून फिट्स (मिरगी) येतात. त्याला पकडले तेव्हाही तो चक्कर येऊन पडला. त्यामुळे त्याला नाशिकमधील स्थानिक रुग्णालयात दाखल करावे लागले. तेथून सोडल्यांनतर त्याला मुंबईत आणताना दोन वेळा तसाच त्रास झाला. असे असतानाही धारावी पोलिसांनी शुभमच्या भावाला सोबत घेऊन त्याला सुखरूप मुंबईत आणून शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल केले.