मुंबई: शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी तीन वर्ष कालावधीच्या पूर्णवेळ पोस्ट एसएससी पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान / वास्तुकला अभ्यासक्रम राबविणाऱ्या राज्यातील शासकीय, अशासकीय अनुदानित, विद्यापीठ संचालित व खाजगी विनाअनुदानित पदविका शैक्षणिक संस्थांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशप्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना १६ जूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अंतिम गुणवत्ता यादी २३ जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल १३ मे रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाल्यानंतर तंत्रशिक्षण संचालनालयाकडून २० मे पासून https://poly25.dtemaharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. विद्यार्थ्यांना २० मे पासून १६ जूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. याच कालावधीत विद्यार्थ्यांना कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रे पडताळणी करणे आणि अर्ज निश्चिती करता येणार आहे.

कागदपत्रांची पडताळणी ऑनलाईन व प्रत्यक्ष दोन्ही पद्धतीने करता येणार आहे. त्यानंतर निश्चित होणारे अर्ज हे संस्थास्तरावरील फेरीसाठी विचारात घेण्यात येणार आहेत. १८ जून रोजी संकेतस्थळावर तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. त्यानंतर तात्पुरत्या गुणवत्ता यादीत दर्शविलेल्या माहितीबाबत काही आक्षेप असल्यास १९ ते २१ मे दरम्यान तक्रार नोंदवता येणार आहे. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी २३ जून रोजी प्रकाशित करण्यात येणार आहे.

पॉलिटेक्निक प्रवेशाचे वेळापत्रक

ऑनलाईन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे – २० मे ते १६ जून

प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्चिती करणे – २० मे ते १६ जून

तात्पुरत्या गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे – १८ जून

तात्पुरत्या गुणवत्ता यादीसंदर्भात हरकत सादर करणे –१९ ते २१ जून

अंतिम गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे – २३ जून

अडचणी दूर करण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक

प्रवेश अर्ज भरण्याबरोबरच प्रवेश प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींबाबत विद्यार्थ्यांना काही तक्रार असल्यास ती दूर करण्यासाठी तंत्र शिक्षण संचालनालयाकडून ७६६९१००२५७/ १८००३१३२१६४ हा मदत क्रमांक सुरू करण्यात आला आहे. सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत त्यावर संपर्क साधता येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रवेशासाठी शुल्क

राज्यातील खुला प्रवर्ग, राज्याबाहेरील आणि जम्मू काश्मिर व लडाख या संघराज्यातून विस्थापित झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ४०० रुपये, तसेच राज्यातील सर्व राखीव प्रवर्ग आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ३०० रुपये शुल्क अर्ज भरताना ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे.