मुंबई : पॉलिटेक्निक (तंत्रशिक्षण पदविका) अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची दुसरी यादी सोमवारी तंत्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केली आहे. या फेरीसाठी ६३ हजार ४६० विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी ५१ हजार २२३ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाले आहेत. या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना २२ ते २४ जुलै या कालावधीत संबंधित संस्थेत जाऊन मूळ कागदपत्रांसह प्रवेश घ्यावे लागणार आहेत.

तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. या फेरीसाठी ६३ हजार ७८८ जागा उपलब्ध होत्या. यासाठी ८७ हजार ९७६ विद्यार्थी पात्र होते. या पात्र विद्यार्थ्यांपैकी ६३ हजार ४६० विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरले होते. या फेरीतून पसंतीक्रम भरलेल्या ८०.३० टक्के विद्यार्थ्यांना या फेरीत प्रवेश मिळाले असून ही संख्या ५१ हजार २२३ इतकी आहे. यामधील पहिले तीन पर्याय नोंदविलेल्या २८ हजार ९०२ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना २२ ते २४ जुलै दरम्यान प्रवेश निश्चित करायचा आहे. या फेरीत ज्यांना प्रथमच जागा मिळाली आहे किंवा ज्यांना पहिल्या तीन पसंतींपैकी जागा मिळाली आहे, अशा विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करुन शुल्क भरले तर अशा विद्यार्थ्याना पुढील फेरीत सहभागी होता येणार नाही.

तसेच, जे विद्यार्थी चौथ्या किंवा त्यानंतरच्या पसंतीनुसार जागा मिळाल्याने समाधानी आहेत, त्यांनी ‘फ्रीज’ पर्याय निवडून प्रवेश निश्चित करावा. मात्र, ज्यांना पुढील फेरीत चांगली संधी मिळू शकते असे वाटत असल्यास त्यांनी ‘नॉट फ्रीज्ड पर्याय निवडावा असेही आवाहन करण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसऱ्या फेरीनंतर रिक्त राहिलेल्या जागांची यादी २५ जुलै रोजी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर २६ व २७ जुलै या दोन दिवसात पर्याय भरण्याची प्रक्रिया सुरु होईल. यानंतर तिसरी प्रवेश फेरी २९ जुलै जाहीर केली जाणार आहे.