मुंबई : गणेशोत्सव, नवरात्र, दसरा आणि श्राद्ध-पितृपक्षाचा काळ संपल्यानंतर पुन्हा एकदा शहरांतील मासळी बाजारात मांसाहारप्रेमींची गर्दी वाढू लागली आहे. ग्राहकांच्या गर्दीमुळे मासळी बाजारात वर्दळ वाढू लागली असली तरीही वातावरणीय बदलांमुळे बाजारात पुरेशा प्रमाणात मासे उपलब्ध नाहीत. त्यामुळे ऐन हंगामात माशांच्या पुरवठ्यात घट झाली असून त्यांच्या किंमतीत वाढल्याचे आढळून येत आहे. तसेच, मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने मासळी विक्रेत्यांमधील चिंतेचे वातावरण अद्यापही ‘जैसे थे’च आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून उत्सवांमुळे अनेकांनी मांसाहाराकडे पाठ फिरवली होती. मात्र, सण उत्सव संपताच मांसाहारींनी पुन्हा मासळी बाजाराकडे धाव घेतली आहे. रविवारपासून मासळी बाजारात ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. मात्र, गेल्या आठवड्यात झालेला मुसळधार पाऊस आणि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्ती चक्रीवादळामुळे राज्यातील मच्छीमारांना खोल समुद्रात मासेमारीसाठी जाण्यास शासनाने मनाई केली होती. त्यामुळे मासेमारांच्या बोटी समुद्रात गेल्या नव्हत्या. परिणामी, बाजारातील मासळी पुरवठ्यात घट झाली.

त्यामुळे सध्या मुंबईत बंगाल, आंध्र प्रदेश व गुजरातमधून माशांचा पुरवठा होत आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने माशांच्या किंमतीतही वाढ झाली आहे. दरम्यान, समुद्रातील वातावरण आता शांत झाल्याने हळूहळू मच्छीमारांच्या बोटी समुद्रात जाण्यास सज्ज झाल्या आहेत. मात्र, एकदा बोट समुद्रात गेल्यास ८ ते १० दिवस ती परतत नाही. त्यामुळे मासळी बाजारात पुढील काही दिवस माशांचा पुरवठा कमीच राहण्याची चिन्हे आहेत.

सण उत्सवाचा कालावधी संपल्याने रविवारपासून मुंबईसह ठाणे, कल्याण, नवी मुंबई, सातपाटी, वसई, विरार आदी भागातील मासळी बाजारपेठांत ग्राहकांची गर्दी होऊ लागली आहे. ऑगस्टमध्ये माशांच्या दरात मोठी घसरण झाली होती. मात्र, आता त्यात चांगलीच वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये ५०० रुपये किलोने विक्री होणारे पापलेट सध्या ९०० रुपये किलो दराने विकले जात आहेत. तसेच, १ किलो हलव्यासाठी ७०० रुपये, तर सुरमईसाठी ६५० रुपये मोजावे लागत आहेत.

मासे – सध्याचे दर (१ किलो) – ऑगस्टमधील दर

पापलेट – ९०० रुपये – ५०० रुपये

हलवा – ७०० रूपये – ४०० रुपये

बोंबील – २०० रुपये – ८० रुपये

बांगडा – १८० रुपये – १०० रुपये

सुरमई – ६०० ते ६५० रुपये – ४०० रुपये

वादळी वारे आणि अतिवृष्टीमुळे मासेमारीवर मर्यादा

साधारणपणे ऑगस्ट ते डिसेंबर आणि जानेवारी ते मे हे दोन मासळी हंगाम असतात. पहिल्या हंगामात बाजारात प्रचंड प्रमाणात मासे विक्रीसाठी उपलब्ध होतात. परिणामी, मासळी विक्रेत्यांना आर्थिक नफा मिळतो. मात्र, यंदा वादळी वारे आणि अतिवृष्टीमुळे मासेमारीवर मर्यादा आल्या. त्यामुळे मासळी व्यवसायावर मोठा परिणाम झाला. तसेच, समुद्रातील प्रतिकूल वातावरणामुळे माशांचेही मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाल्यामुळे बाजारातील मासळी पुरवठ्यावर परिणाम झाला. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून मासळी विक्रेत्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी शासनाकडे करण्यात आल्याचे अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी सांगितले.