मुंबई : हास्य, थरार आणि गूढतेने भरलेल्या ‘स्मार्ट सूनबाई’ या नवीन मराठी चित्रपटाच्या मुख्य पोस्टरचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतेच अनावरण करण्यात आले. याप्रसंगी अजित पवार यांनी सर्व कलाकार व तंत्रज्ञाचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या. शिवाजी दोलताडे दिग्दर्शित, गोवर्धन दोलताडे व गार्गी निर्मित आणि कार्तिक दोलताडे पाटील सह निर्मित ‘स्मार्ट सूनबाई’ हा चित्रपट २१ नोव्हेंबर २०२५ पासून महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे.
‘स्मार्ट सूनबाई’ चित्रपटाच्या मुख्य पोस्टर अनावरण प्रसंगी लेखक व निर्माते गोवर्धन दोलताडे व अभिनेते रोहन पाटील उपस्थित होते. या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरने प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगली होती, तर आता मुख्य पोस्टर आल्यानंतर उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत व लोकप्रिय चेहरे झळकणार आहेत. यामध्ये प्रसिद्ध अभिनेता संतोष जुवेकर, रोहन पाटील, भाऊ कदम, किशोरी शहाणे, मोहन जोशी, दीपक शिर्के, अंशुमन विचारे, विनम्र बाबल, सायली देवधर, प्राजक्ता गायकवाड, प्राजक्ता हनमघर, स्नेहल शिदम, उषा नाईक, भक्ती चव्हाण, दीप्ती सोनवणे, अनुष्का बेनके, पूजा राजपूत, सुचिका जोशी, विद्या मेहेत्रे, आर्या सकुंडे, वैशाली चौधरी, सपना पवार, कांचन चौधरी यांचा समावेश आहे. या सर्व कलाकारांच्या अनोख्या केमिस्ट्रीमुळे चित्रपट रंजक ठरणार आहे.
‘स्मार्ट सूनबाई’ चित्रपटाची कथा आणि लेखन योगेश शिरसाट यांनी केले आहे. गीतकार वैभव देशमुख, अदिती द्रविड असून अजय गोगावले, वैशाली माडे, आनंदी जोशी, सावनी रवींद्र, उर्मिला धनगर यांचे स्वर गाण्यांना लाभले आहेत. तर ही गीते विजय नारायण गवंडे, साई – पियुष यांनी संगीतबद्ध केली आहे. रहस्य, हास्य आणि भावबंधांचा मेळ साधणारा ‘स्मार्ट सुनबाई’ हा चित्रपट परिपूर्ण कौटुंबिक मेजवानी ठरणार असून २१ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.