मुंबई : बदलत्या जीवनशैलीमुळे नागरिकांचे मानसिक आरोग्य ढासळत असून, नैराश्यामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य क्षेत्रामधील तज्ज्ञ व कुशल परिचारिकांची आवश्यकता निर्माण होत आहे. त्यामुळे ठाणे येथील प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये ‘एम.एस्सी नर्सिंग इन मेंटल हेल्थ’ हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. हा अभ्यासक्रम सुरू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली असून, आवश्यक परवानगी व मनुष्यबळाची भरती केल्यानंतर पुढील वर्षीपासून हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.
बदलती जीवनशैली, कामाचा ताण, कामामध्ये किंवा परीक्षेमध्ये अपयश, घरातील कुरबुरी यासारख्या अनेक बाबींमुळे नागरिकांमध्ये तणावाचे प्रमाण वाढत आहे. यामुळे अनेकजण नैराश्यग्रस्त होत आहेत. ठाणे मनोरुग्णालयामध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने डॉक्टर, परिचारिका व समुपदेशक यांची आवश्यकता वाढत आहे. राज्यामध्ये मानसिक आरोग्यासंदर्भातील परिचारिकांनाचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था नाहीत. त्यामुळे परिचारिकांना बंगळुरूमध्ये प्रशिक्षणासाठी जावे लागत होते. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रादेशिक मनोरुग्णालयातील शिक्षणसंस्था सक्षम करण्याबाबत आरोग्य विभागाला पत्र लिहिले होते. त्यानुसार राज्य सरकारने तीन वर्षांपूर्वी ठाणे मनोरुग्णालयामध्ये डिप्लोमा इन मेंटल हेल्थ हा परिचारिका अभ्यासक्रम सुरू केल्यानंतर आता पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रामध्ये मानसिक आरोग्य परिचारिका अभ्यासक्रम शिकविणारी महाविद्यालये फार कमी असल्याने परिचारिकांची संख्याही फारच कमी आहे. त्यामुळे मानसिक आरोग्य परिचारिकांसाठी तीन वर्षांपूर्वी पुणे व ठाण्यामध्ये २० जागांचा पदविका अभ्यासक्रम सुरू केला होता. त्याला यश आल्यानंतर पदव्युत्तर परिचारिका अभ्यासक्रम सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव आरोग्य विभागाकडे सादर केला होता. त्यानुसार १० जागांसाठी मान्यता मिळाली आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमामुळे मानसिक आरोग्यामधील तज्ज्ञ परिचारिका मिळाल्याने नागरिकांच्या आरोग्य समस्या दूर करण्यास मदत होणार आहे. यामुळे जनजागृती होईल आणि नागरिकांमधील गैरसमज दूर होण्यास मदत होईल, अशी माहिती ठाणे मनोरुग्णालयाचे प्रमुख डॉ. नेताजी मुळीक यांनी दिली.
आवश्यक पात्रता
एम.एस्सी नर्सिंग या अभ्यासक्रमाची विद्यार्थी प्रवेश क्षमता प्रती वर्षी १० इतकी असणार आहे. तसेच या प्रशिक्षणाचा कालावधी २ वर्ष असणार आहे. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी बी.एस्सी नर्सिंग किंवा पोस्ट बेसिक बीएसस्सी नर्सिंग अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेला असणे आवश्यक आहे.
पुढील शैक्षणिक वर्षापासून होणार सुरू
राज्य सरकारने अभ्यासक्रम सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची मान्यता व या अभ्यासक्रमासाठी पायाभूत सुविधा उभारण्याबरोबरच आवश्यक मनुष्यबळाची भरतीची प्रक्रिया लवकरच करण्यात येणार आहे. त्यामुळे हा अभ्याक्रम पुढील वर्षापासून सुरू होण्याची शक्यता आहे.
राज्यामध्ये १० ते १५ टक्क्यांनी मानसिक आरोग्याच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, यामध्ये हलक्या ते तीव्र स्वरुपाचे रुग्ण असतात. त्यांच्यावर वेळीच उपचार करण्यासाठी डॉक्टरांबरोबरच तज्ज्ञ परिचारिका व समुपदेशकांचीही आवश्यकता असते. या अभ्यासक्रमामुळे तज्ज्ञ परिचारिका व समुपदेशकांच्या संख्येत वाढ होईल. – डॉ. नेताजी मुळीक, प्रमुख, ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय
