मुंबई : हुंड्यासाठी छळ केल्यामुळे २२ वर्षीय विवाहित महिलेने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पवई पोलिसांनी महिलेच्या पतीसह सासू, सासरे आणि दोन नणंदांविरोधात हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मुळच्या उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेल्या २२ वर्षीय महिलेचा फेब्रुवारी २०२४ मध्ये मुंबईतील तरुणाबरोबर विवाह झाला होता. लग्न झाल्यानंतर ३ महिन्यांनी महिला पतीसोबत पवई येथील घरी राहण्यासाठी आली होती. सासरी पती, सासू, सासरे आणि दोन नणंदा असा परिवार होता. तिच्या सासरच्या मंडळीनी हुंड्यासाठी तिचा छळ सुरू होता. या छळास कंटाळून २३ ऑक्टोबर रोजी महिलेने राहत्या घरात आत्महत्या केली.

हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप

महिलेच्या वडिलांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. माझ्या मुलीचा हुंड्यासाठी छळ केला जात होता. पती आणि सासरच्या लोकांकडून होणाऱ्या छळामुळे माझ्या मुलीने आत्महत्या केली, अशी तक्रार त्यांनी केली. लग्नाच्या वेळी हुंडा म्हणून रोख रक्कम आणि काही वस्तू देण्याचे ठरले होते. त्या मी दिल्या होत्या.

परंतु हुंड्याच्या रकमेतील १ लाख रुपये देणे बाकी होते. ती रक्कम मिळावी म्हणून मुलीचा छळ करण्यात येत होता. याबाबत मुलीने मला माहिती दिली होती, असे तक्रारीत म्हटले आहे. तिला फोन वापरू देत नव्हते, तसेच तिचा शारिरीक आणि मानसिक छळ केला जात होता. सप्टेंबर महिन्यात मुलगी आणि जावई गावी आले तेव्हा मी उर्वरित १ लाख रुपये देण्यासाठी वेळ मागितला होता. मात्र मुलीचा छळ सुरूच होता, असेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

पाच जणांविरोधात गुन्हा

महिलेच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तिचा पती, सासरे, सासू, दोन नणंदा या ५ जणांविरोधात हुंडा मागणे आणि हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ८५ आणि ८० अन्वये गुन्हा दाखल केला.