मुंबई : परीक्षा केंद्राबाहेर वाहनात ठेवलेल्या मोबाइलसह अन्य मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतीन तिघांना पवई पोलिसांनी अटक केली. या तिघाना आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम् येथे अटक करण्यात आली. या टोळी विरोधात विशाखापट्टणम् येथे अनेक गुन्हे नोंद आहेत.
परिक्षा केंद्रात शेकडो विद्यार्थी, तसेच प्राध्यापक येतात. कॉपीसारखे गैरप्रकार टाळण्यासाठी मोबाइल फोन आणि इतर साहित्य परीक्षा केंद्रात नेण्यास मनाई आहे. त्यामुळे हे साहित्य केंद्राबाहेर ठेवण्यात येते. अनेक जण आपली दुचाकी आणि चारचाकी वाहनात मोबाइल आणि अन्य साहित्य ठेवतात. नेमके हेच या टोळीने हेरले होते. पवईतील एका परीक्षा केंद्राजवळ २८ मे रोजी चोरी झाली होती. रुईया महाविद्यालयातील एका प्राध्यापकाने परीक्षा केंद्राबाहेर आपली स्कूटर उभी केली होती. परीक्षेच्या नियमांमुळे त्यांनी आपला मोबाइल आणि एटीएम कार्ड स्कूटरच्या डिक्कीत ठेवले होते. मात्र परीक्षा संपून ते परतले, तेव्हा त्यांना डिक्कीतील वस्तू चोरीला गेल्याचे लक्षात आले. सुरुवातीला त्यांनी मोबाइल चोरीची तक्रार केली. मात्र चोरांनी या सिमकार्डचा वापर करून प्राध्यापकाच्या बॅंकेतील ७० हजार रुपये एटीएममधून काढले. याशिवाय १९ हजार रुपयांची खरेदी केली. त्यामुळे त्यांनी पवई पोलीस ठाण्यात नव्याने तक्रार केली. चोरीची ही पद्धत नवी होती. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला होता.
आंध्र प्रदेशातील टोळीचा पर्दाफाश
पवई पोलिसांनी या चोरीचा तपास करताना साकी विहार रोडवरील एटीएम आणि कुर्ला येथील फिनिक्स मॉलमधील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण तपासून आरोपींचा ठावठिकाणा लावला. या प्रकरणी प्रिन्स सिंह (२७), कृष्णा जसबीर (२१) आणि धर्मेंद्र सिंह (३०) या तिघांना आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम् येथून अटक केली. या टोळीने जून महिन्यात विशाखापट्टणम् येथेही अशाच प्रकारे चोरी केल्याचे उघड झाले. आंध्र प्रदेश शिक्षक पात्रता परीक्षेदरम्यान गाजुवाका येथील आयओएन डिजिटल सेंटर बाहेर एका महिलेच्या दुचाकीच्या डिक्कीतून त्यांनी ४३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, मोबाइल, डेबिट कार्ड, सिमकार्ड आणि रोख दोन हजार रुपये लंपास केले होते. विशाखापट्टणम् पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाजुवाका, पेंडुर्थी, विमानतळ आणि अरिलोवा पोलीस ठाण्यांमध्ये या टोळीविरोधात अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. या टोळीने मुंबईत आणखी कुठे गुन्हे केले आहेत का, याचा पवई पोलीस तपास करीत आहेत.