Prabhadevi Bridge Demolition Work मुंबई : अटल सेतूला जोडणाऱ्या शिवडी – वरळी उन्नत रस्ता प्रकल्पाअंतर्गत प्रभादेवी येथील १२५ वर्ष जुना प्रभादेवी पूल पाडून त्याजागी नवीन दुहेरी पूल बांधण्यात येणार आहे. या कामासाठी प्रभादेवीचा जुना पूल बंद करून तो पाडण्यासाठी मागील कित्येक महिन्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) प्रयत्नशील आहे. मात्र रहिवाशांच्या विरोधामुळे रखडलेले पाडकाम आता गणेशोत्सवानंतर सुरू करण्यात येणार आहे. एमएमआरडीएच्या मागणीनुसार वाहतूक पोलिसांनी १० सप्टेंबरपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १० सप्टेंबरला रात्री पूल बंद करून पाडकामास सुरुवात होणार आहे. मात्र पुलाच्या पाडकामाला रहिवाशांचा तीव्र विरोध असून रहिवासी पुन्हा रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. यामुळे प्रभादेवी पुलाचा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.

दक्षिण मुंबईतून अटल सेतूवर पोहचणे सोपे व्हावे यासाठी एमएमआरडीएने शिवडी – वरळी उन्नत रस्ता बांधण्याचा निर्णय घेऊन या कामाला सुरुवात केली. मात्र हा प्रकल्प संथगतीने सुरू आहे. या प्रकल्पातील महत्त्वाच्या प्रभादेवी दुहेरी पुलाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. या दुहेरी पुलासाठी जुना पूल बंद करून पाडावा लागणार आहे. त्यानुसार हा पूल बंद करण्यासाठी एमएमआरडीए फेब्रुवारीपासून प्रयत्न करीत आहे. मात्र त्यात त्यांना यश आलेले नाही. दुहेरी पुलाच्या कामासाठी प्रभादेवी येथील १९ इमारती पाडाव्या लागणार होत्या. मात्र त्यास विरोध झाल्याने एमएमआरडीएने दुहेरी पुलाच्या आराखड्यात बदल केला. त्यानंतर येथील केवळ दोन इमारती पाडाव्या लागणार आहेत. या दोन इमारतींचे पुनर्वसन करून पुलाचे पाडकाम करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला. मात्र यालाही दोन इमारतींतील रहिवाशांनी विरोध केला आहे. आपले तिथल्या तिथेच पुनर्वसन करावे, १९ इमारतींचा समूह पुनर्विकास करावा, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात आली आहे. याच मागणीसाठी रहिवासी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी एप्रिलमध्ये पूल बंद होऊ दिला नाही. त्यामुळे एमएमआरडीएला जुन्या पुलाच्या पाडकामाचा निर्णय पुढे ढकलावा लागला.

पुलाचे पाडकाम आणि नवीन दुहेरी पुलाचे काम रखडल्याने एमएमआरडीएचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे आता गणेशोत्सवानंतर जुना पूल बंद करून त्याच्या पाडकामासाठी परवानगी देण्याची मागणी एमएमआरडीएने वाहतूक पोलिसांकडे केल्याची माहिती वाहतूक पोलिसातील उच्च अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. या मागणीनुसार १० सप्टेंबर रोजी रात्री पूल वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे आता १० सप्टेंबर रोजी रात्री पूल बंद झाल्यानंतर त्याच्या पाडकामाला सुरुवात होणार आहे. आपल्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी न लावात पूल पाडण्याचा निर्णय कसा काय घेतला जाऊ शकतो असा प्रश्न रहिवाशांनी उपस्थित करून नाराजी व्यक्त केली आहे. तर बाधित इमारतीतील रहिवासी रस्त्यावर उतरतील आणि कोणत्याही परिस्थितीत पूल बंद होऊ देणार नाहीत, असा इशारा बाधित हाजी नुरानी इमारतीतील रहिवासी मुनाफ पटेल यांनी दिला. तसेच मनसे आणि शिवसेनेचे (ठाकरे) कार्यकर्ते रहिवाशांसोबत रस्त्यावर उतरतील, असा इशारा मनसे वाहतूक सेनेने दिला आहे.