मुंबई : जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील उपहारगृहामध्ये मुंबई महानगरपालिकेचे उप आयुक्त (वित्त) प्रशांत गायकवाड यांच्या हस्ते शुक्रवार, ३० मे रोजी ‘पोस्टर प्रदर्शनाचे’ उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी उपस्थितांना जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त तंबाखूचे सेवन न करण्याची तसेच व्यसनांपासून दूर राहण्याची शपथ देण्यात आली. तसेच मुंबई तंबाखूमुक्त करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य समितीद्वारे ३१ मे २०२५ पासून मुंबईत मोठ्या स्तरावर तंबाखूमुक्त अभियान राबविण्यात येणार आहे.

मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना व्यसनमुक्तीची शपथ दिल्यानंतर व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान कर्मचाऱ्यांना तंबाखूचे दुष्परिणाम सांगणारी पत्रकेही देण्यात आली. तंबाखू व इतर व्यसनांच्या दुष्परिणामांची माहिती अधिकाधिक प्रभावीपणे देण्यासाठी आणि ‘तंबाखूजन्य पदार्थ व विक्री कायदा २००३’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील उपहारगृहामध्ये ‘पोस्टर प्रदर्शन’ही भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभास प्रमुख कामगार अधिकारी सुनील जांगळे यांच्यासह नशाबंदी मंडळाचे चिटणीस अमोल मडामे, नशाबंदीमंडळ कार्यक्रम समन्वयक मिलिंद पाटील, संदीप नेमलेकर, ‘सलाम मुंबई फाउंडेशन’चे समन्वयक संजय ठांगणे, विशाल जाधव यांच्यासह मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतात १३ ते १५ वयोगटातील ८.५ टक्के कुमारवयीन मुले तंबाखूच्या अधीन गेली आहेत. भारतात दरदिवशी ५ हजार ५०० नवीन युवक तंबाखूच्या चक्रव्यूहात अडकतात. तसेच दरदिवशी ३ हजार ५०० लोकांचा तंबाखूच्या व्यसनामुळे मृत्यू होतो. गंभीर बाब म्हणजे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे भारतात दरवर्षी १३ लाख लोक मृत्युमुखी पडत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) अहवालातून पुढे आले आहे. यासंदर्भात समाजात जनजागृती करण्याच्या उद्देशाने जागतिक तंबाखूविरोधी दिन दरवर्षी ३१ मे रोजी साजरा केला जातो. यानिमित्ताने मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग, कामगार विभाग आणि महाराष्ट्र राज्याचे नशाबंदी मंडळ आणि ‘सलाम मुंबई फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिका आपल्या कर्मचाऱ्यांसाठी विविध आरोग्य व वैद्यकीय सेवा-सुविधाही पुरवित असते.