मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या भारत जोडो पदयात्रेचे आता काही दिवसांतच महाराष्ट्रात आगमन होणार आहे. राज्यात दोन आठवडय़ांच्या कालावधीत पदयात्रेचा ज्या ठिकाणी मुक्काम असेल, तेथे विविध सामाजिक गटांशी राहुल गांधी संवाद साधणार आहेत. नांदेड व शेगाव येथे त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. या दोन्ही सभांमधून काँग्रेसने शक्तिप्रदर्शन करण्याचे ठरविले आहे. 

भाजपच्या हिंदूत्ववादी राजकारणाला आव्हान देत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ७ सप्टेंबरपासून कन्याकुमारीपासून भारत जोडो पदयात्रेला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात ७ नोव्हेंबरला यात्रेचे आगमन होत आहे. तेलंगणातून नांदेड जिल्ह्यातील देगलुर येथून यात्रेचा महाराष्ट्रात प्रवेश होईल. भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी यांचा महाराष्ट्रात १७ दिवसांच्या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु त्यात आता थोडा बदल करण्यात आला असून राज्यात १४ दिवस पदयात्रा चालेल, असे सांगण्यात आले.

राज्यात ही पदयात्रा प्रामुख्याने मराठवाडय़ातील दोन व विदर्भातील तीन जिल्ह्यांमधून जाणार आहे. राज्यातील पदयात्रा यशस्वी करण्यासाठी काँग्रेसचे  सारे नेते, प्रमुख पदाधिकारी सध्या तयारीला लागले आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, भारत जोडो पदयात्रेचे महाराष्ट्राचे समन्वयक बाळासाहेब थोरात, माजी मंत्री अ‍ॅड यशोमती ठाकूर, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी आदी नेत्यांनी महाराष्ट्रात पदयात्रेचे जेथून आगमन होणार आहे, त्या मार्गाची पाहणी केली. राहुल गांधी यांचा राज्यातील दौरा यशस्वी करण्याची जोरदार तयारी सुरू आहे.

पाच लाखांच्या सभेचे नियोजन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राहुल गांधी यांची पहिली जाहीर सभा नांदेड येथे होणार आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा हा जिल्हा आहे, राहुल यांच्या सभेच्या निमित्ताने चव्हाण यांचेही शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी सुरू आहे. दुसरी मोठी जाहीर सभा शेगावला होणार आहे. शेगावला पाच लाखांची सभा करण्याचे नियोजन असून, त्या दृष्टीने राज्यातील नेत्यांची तयारी सुरू आहे. भारत जोडो पदयात्रेचा ७ ते २० नोव्हेंबर या कालावधीत ३८२ किलोमीटरचा प्रवास करणार आहे. जळगाव-जामोदमधून ही यात्रा पुढे मध्य प्रदेशात जाणार आहे.