लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : मनोज जरांगे-पाटील यांचे विरोधक अजय बारसकर वास्तव्यास असलेल्या हॉटेलमधून ताब्यात घेण्यात आलेल्या दोन संशयीतांसह एकूण पाच जणांविरोधात मरिन डाईव्ह पोलिसांनी कट रचणे व जमावबंदी आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. मरिन ड्राईव्ह पोलिसांनी यापैकी चार आरोपींविरोधात सुरक्षेच्या दृष्टीने शनिवारी प्रतिबंधात्मक कारवाई केली.

बारसकर चर्चगेट येथील ऑस्ट्रीया या हॉटेलमध्ये वास्तव्याला होते. तेथे पाच ते सहा जण शुक्रवारी सायंकाळी जमा झाले होते. ते बारस्कर यांच्याबाबत तेथील हॉटेल कर्मचाऱ्यांकडे चौकशी करीत होते. त्यावेळी बारसकर यांचे सहकारी सत्यावान शिंदे व आझाद मैदान पोलिसांचे पथक हॉटेलमध्ये दाखल झाले. त्यावेळी तेथून पळण्याच्या प्रयत्नात असलेल्या गणेश ढोकळे पाटील व संदीप तानपुरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यासह आणखी तिघे तेथे आले होते, अशी माहिती मिळल्यानंतर मरिन ड्राईव्ह पोलिसांनी पाच संशयीतांविरोधात कट रचणे, जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी भादंवि कलम १४३, १४९, १२०(ब) व मुंबई पोलीस कायदा कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल केला.

आणखी वाचा-वृक्षांवरील विद्युत रोषणाई कीटक, पक्ष्यांसाठी घातक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बारसकर यांच्यावर हल्ला करण्याच्या उद्देशाने आरोपी हॉटेलमध्ये आल्याचा संशय आहे. आम्ही फक्त बारसकर यांना जाब विचारण्यासाठी तेथे आल्याचा दावा आरोपींनी चौकशीत केला. या गुन्ह्यांत आरोपींना सीआरपीसी ४१(अ)(१) अंतर्गत नोटीस देऊन सोडण्यात आले. पण आरोपींमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो, त्यादृष्टीने मरिन ड्राईव्ह पोलिसांनी आरोपी गणेश ढोकळे पाटील, संदीप तानपुरे, विजय देशमुख व विनोद पोखरकर यांच्यावर सीआरपीसी कलम १५१ (अ) अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करून शनिवारी त्यांना ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांनी आपण ५ मार्चपर्यंत मुंबईत येणार नसल्याची हमी दिली. त्या अटीवर चौघांचीही सुटका करण्यात आली. पाचव्या आरोपीची ओळख पटली असून लवकर त्याला मुंबई पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात येण्याची शक्यता आहे.