मुंबई : अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत पुनर्विकसित परळ रेल्वे स्थानकासह देशातील १०३ पुनर्विकसित रेल्वे स्थानकांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजस्थान येथील बिकानेर येथून ऑनलाइन उपस्थितीत गुरुवारी संपन्न झाला. त्यात मध्य रेल्वेच्या अंतर्गत येणाऱ्या १२ स्थानकांचा समावेश होता. मुंबई उपनगरीय मार्गावरील चिंचपोकळी, परळ, वडाळा रोड, माटुंगा आणि शहाड या अमृत भारत स्थानकांचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे आता प्रवाशांना या रेल्वे स्थानकातून नव्या आणि आधुनिक स्वरुपाची सेवा मिळणार आहे.
मध्य रेल्वेतर्फे मुंबईतील पुनर्विकसित परळ स्थानकात महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अमृत भारत स्थानकांच्या लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परळ येथील कार्यक्रमात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना, विभागीय रेल्वे व्यवस्थापक हिरेश मीना, मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि आमंत्रित उपस्थित होते. बिकानेर येथील मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, विविध राज्यांचे राज्यपाल व मुख्यमंत्री, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय विधी व न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आदी सहभागी झाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशातील १,३०० पेक्षा अधिक स्थानकांना आधुनिक बनविण्याचे काम सुरू आहे. यापैकी १०० पेक्षा जास्त अमृत भारत स्थानके तयार झाली असून सुमारे २६ हजार कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन झाले आहे. देशातील रेल्वे आणि स्थानके आधुनिक करण्यासाठी गेल्या एका दशकापेक्षा अधिक काळ जेवढा खर्च केले गेला त्यापेक्षा ६ पट जास्त खर्च होत आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, मागील ११ वर्षांत ३४ हजार किमी रेल्वे रुळ तयार करून रेल्वेचा अभूतपूर्व विकास केला आहे. नमो भारत अमृत भारत, एलएचबी डब्यांसह असलेल्या नवीन रेल्वेगाड्यांमुळे रेल्वेचा चेहरामोहरा बदलतो आहे. रेल्वे गरिबांसाठी काम करत असून त्यांच्यासाठी अभूतपूर्व काम सुरू आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी २८०० कोटी
अमृत भारत योजनेअंतर्गत देशातील १०३ स्थानकांचे, तर राज्यातील १५ स्थानकांचे लोकार्पण करण्यात आले आहे. त्यात मुंबईतील ४ आणि शहाड स्थानकाचा समावेश आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मुंबईतील सर्वात महत्त्वाच्या स्थानकाचे २,८०० कोटी रुपये खर्च करून स्वरूप बदलण्यात येत आहे. नमो भारत, अमृत भारत सारख्या आधुनिक ट्रेन सामान्य नागरिकांसाठी चालवून स्वच्छ आणि आरामदायक सेवा पुरविली जात आहे. देशातले हजार रेल्वे स्थानके सुधारून विमानतळाप्रमाणे सुसज्ज बनवून नवभारत घडवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे श्रीमंत ते गरिबांपर्यंत सर्वांनाच हेवा वाटेल, अशा प्रकारची आधुनिक स्थानके येत्या काळात उभी केली जातील.
मध्य रेल्वेच्या अंतर्गत येणाऱ्या स्थानकांच्या पुनर्विकासाचे काम केवळ १५ महिन्यांत यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. मध्य रेल्वेच्या अंतर्गत असलेल्या ८० स्थानकांपैकी १२ प्रमुख स्थानके समाविष्ट आहेत. १३८ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या एकत्रित खर्चाने ही स्थानके आधुनिक प्रवासी-अनुकूल सुविधांनी विकसित करण्यात आली आहेत.