मुंबई : ‘‘आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी अयोध्येतील राम मंदिर तयार झाले तरी, त्याचा भाजपला फारसा फायदा होण्याची शक्यता नाही. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगण या चार राज्यांच्या आगामी निवडणुकांत यश मिळणे भाजपला कठीण आहे. पूर्वीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहराही चालत नाही, याचा अंदाज भाजप नेत्यांना आल्यानेच उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक जागा असलेल्या महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडी खिळखिळी करण्यावर भाजपने भर दिल्याचे भाष्य माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी केले.

‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात बोलताना चव्हाण यांनी अजित पवार यांच्या बंडासह महाराष्ट्रातील ताज्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले. ‘‘आगामी लोकसभा निवडणुकीत मोदींचा पराभव करण्यासाठी १९७७ च्या जयप्रकाश नारायण यांचे प्रारुप वापरुन सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन लढले पाहिजे’’, असे मत चव्हाण यांनी मांडले. ‘‘जयप्रकाश नारायण यांनी इंदिरा गांधी यांच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांना एकत्र केले होते. त्यावेळी विरोधी आघाडीचा नेता किंवा चेहरा पुढे केला नव्हता. तरीही निवडणुकीत चांगले यश मिळाले. त्याचप्रमाणे या वेळीही नेता किंवा चेहरा कोण हे जाहीर न करता सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन एकास एक उमेदवार दिला, तर भाजपचा पराभव करता येऊ शकतो’’, असे चव्हाण म्हणाले.

 ‘‘अजित पवार व भाजप यांच्यात खूप दिवसांपासून बैठका सुरु होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्ता संघर्ष आणि नेतृत्व संघर्ष चालूच होता. सुप्रिया सुळे यांची कार्याध्यक्षपदी झालेली नियुक्ती अनेकांना पटली नव्हती. अगदी प्रफुल पटेल यांनी सुप्रिया यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास नकार दिला होता. अजित पवार व त्यांच्याबरोबरचे काही जण सरकारमध्ये सहभागी झाले त्यामागे भाजपची बरीच गणिते आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका जिंकता येणार नाहीत, असे त्यांना वाटते. त्याचबरोबर १० ऑगस्टच्या आत विधानसभा अध्यक्षांना अपात्रतेबाबतचा निर्णय द्यावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडण्यात आली आहे. मात्र अजित पवार यांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारण्यास भाजपमधील काही ज्येष्ठ नेत्यांचा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध होता, तूर्तास त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले आहे’’, असे चव्हाण यांनी सांगितले. शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्याने राज्यात काँग्रेसला वाढण्यास संधी आहे. फक्त त्यासाठी लोकांमध्ये जाऊन त्यांना काँग्रेसच्या मागे उभे करावे लागेल, असेही चव्हाण म्हणाले.

 लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षांची एकजूट होणार नाही, असा प्रयत्न मोदींकडून केला जाऊ शकतो. महाराष्ट्राप्रमाणेच इतर राज्यांमध्येही विविध पक्षांमध्ये फूट पाडण्याचा भाजप प्रयत्न असेल. राजस्थान व बिहारमध्ये तशा त्यांच्या हालचाली सुरु आहेत. पुढे काही महिन्यांत होऊ घातलेल्या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणामध्ये भाजपला फारसे यश मिळणार नाही. त्यामुळे भाजपला लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी महाराष्ट्र राज्य महत्त्वाचे वाटते. महाविकास आघाडीमुळे भाजपसमोर आव्हान उभे राहिले होते. त्यातूनच राष्ट्रवादीत फूट पाडण्यात आली. राष्ट्रवादीतील फाटाफुटीमुळे महाविकास आघाडीवर नक्कीच परिणाम होऊ शकतो, असे चव्हाण यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘काँग्रेसमध्ये फूट पडणार नाही’

शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पाडल्यावर भाजपचे राज्यात पुढील लक्ष्य काँग्रेस पक्ष असू शकतो. काँग्रेसच्या काही आमदारांना फोन केले जात आहेत. मात्र, काँग्रेसमध्ये फूट पडणार नाही, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला. सर्वाधिक आमदार असलेल्या पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपद सोपवावे, हे संकेत आहेत. अजित पवार यांच्या बंडानंतर कोणत्या गटाकडे किती आमदार आहेत, हे एकदा स्पष्ट झाल्यावर विरोधी पक्षनेतेपदाचा प्रश्न आपोआपच सुटेल, असेही चव्हाण म्हणाले.