मुंबई : हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने मुंबई महानगरपालिकेने सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना मंगळवारी सुटी जाहीर केली होती. मात्र चेंबूरमधील आशिष तलाव येथील दोन खासगी शाळांनी प्रशासनाचा सुटीचा आदेश धाब्यावर बसवून विद्यार्थ्यांना सकाळी शाळेत बाेलवले होते. त्यामुळे गुडघाभराहून अधिक पाण्यातून वाट काढत विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागले.

मुंबईमध्ये शनिवारपासून सलग पाऊस पडत असल्याने चेंबूरमधील आशिष तलाव मागील दोन दिवसांपासून ओसंडून वाहत आहे. त्यामुळे तलावाच्या आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले आहे. त्यातच मुंबईमध्ये मंगळवारी हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यामुळे मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मंगळवारी शहर व उपनगरातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर केली होती. मात्र चेंबूरच्या आशिष तलाव परिसरात असलेल्या दोन खासगी शाळांनी शासन निर्णय धाब्यावर बसवून विद्यार्थ्यांना शाळेत बोलवले.

अतिवृष्टीचा इशारा असतानाही शाळा प्रशासनाने सुटीबाबत कोणताही संदेश पाठवला नाही. या दोन्ही खासगी शाळांनी सुटी जाहीर केली नसल्याने सकाळच्या सत्रामधील विद्यार्थांना रस्त्यावर साचलेल्या गुडघाभर पाण्यातून वाट काढत जावे लागले. चेंबूरमध्ये सर्वत्र पाणी तुंबलेले असताना या शाळांमधील विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शाळेत जावे लागले. काही पालक विद्यार्थ्यांना स्वत: पाण्यातून वाट काढून शाळेत सोडत होते. चेंबूरमधील या खासगी शाळांनी सरकारचा निर्णय धाब्यावर बसवत विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात आणली आहे. या प्रकरामुळे काही पालकांनी संताप व्यक्त केला.

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या या शाळा प्रशासनांवर मुंबई महानगरपालिकेने कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.काही शाळांकडून विद्यार्थ्यांना सुटीचा निरोप पोहचवण्यास विलंब झाला आहे. मात्र या दोन शाळांबाबत माहिती घेण्यात येईल, असे मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी सुजाता खरे यांनी सांगितले.