मुंबई: वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात नव्याने बांधलेल्या इमारतीत पाणीपुरवठा, सुरक्षिततेच्या समस्या, पार्किंग व्यवस्था याबाबत शिवसेना (ठाकरे) नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हाडाचे मुख्याधिकारी मिलिंद बोरीकर यांची भेट घेतली. यावेळी रहिवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करून तातडीने सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्यांनी तत्काळ कारवाईची मागणी केली.
आदित्य ठाकरे यांनी वरळीतील पुनर्विकसित इमारतींतील समस्यांबाबतचे निवेदन मुख्याधिकारी मिलिंद बोरीकर यांना दिले. वरळी बीडीडीतील पाणीपुरवठा, सुरक्षितता यावर लक्ष द्यावे. पुनर्वसित इमारतींमधील रहिवाशांना २४ तास पुरेसा पाणीपुरवठा करण्याची काळजी म्हाडाने घ्यावी. तसेच, नवीन इमारतींमध्ये बसवलेल्या एस.टी.पी. (सांडपाणी प्रक्रिया) टाकीची क्षमता, ऑपरेटिंग सिस्टम व दैनंदिन देखभाल याबाबत योग्य कार्यवाही करण्यात यावी. सुरक्षिततेच्या दृष्टीने, लॉबी, लिफ्ट परिसर, गच्ची आणि जिन्यांसारख्या मुख्य ठिकाणी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे आणि अग्निप्रतिबंधक सुरक्षा व्यवस्था बसवली आहे की नाही, याची पाहणी करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.
नवीन सदनिकांमध्ये आवश्यक असलेले इनविजिबल स्टील सुरक्षा ग्रील बसवण्याबाबत त्यांनी अग्निशमन दल आणि म्हाडा अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन नियमांचे पालन करत सुरक्षितता जाळी बसवण्याचा निर्णय घेण्याची मागणी केली. इमारत क्र. १ मधील ‘एफ’ आणि ‘जी’ विंगमधील रहिवाशांना ताबा देण्यापूर्वी फ्लॅटमधील गळती, फ्लोरिंग, दरवाजे व खिडक्यांची गुणवत्ता तपासण्याची सूचनाही करण्यात आली. मनुष्यबळाच्या व्यवस्थापनावर लक्ष वेधत, पुनर्वसित इमारतींसाठी स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, सुरक्षा रक्षक, प्लंबिंग आणि विद्युत तंत्रज्ञ यांसारखे आवश्यक मनुष्यबळ नियुक्त झाले आहे की नाही, याची दक्षता घेण्याची मागणी त्यांनी केली.
याव्यतिरिक्त, प्रत्येक सदनिकेसाठी दोन व चार चाकी पार्किंगची योग्य व्यवस्था आणि महानगर गॅस कंपनीमार्फत गॅस पाईपलाइनचे कायमस्वरूपी कनेक्शन लवकरात लवकर करण्याची मागणी करण्यात आली आहे. रहिवाशांचे प्रश्न त्वरीत आणि प्रभावीपणे सोडवण्यासाठी, या सर्व मुद्यांसाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्याची विनंती आदित्यजी ठाकरे यांनी पत्राच्या शेवटी केली आहे. यामुळे प्रकल्पातील समस्यांचे निवारण वेळेत होण्यास मदत होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
