मुंबई: चेन्नई ते सुरत द्रुतगती मगामार्गीतील रखडलेल्या नाशिक ते अक्कलकोट महामार्गाचा तिढा अखेर सुटला आहे. हा प्रकल्प आता बांधा-वापरा-हस्तांतरीत करा (बीओटी) तत्वावर बांधण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव नुकताच केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर या महामार्गाची अंमलबजावणी बीओटी तत्वावर करण्यासाठी निविदा काढण्यात येणार आहे. नाशिक ते अक्कलकोट असा ३७४ किमीचा महामार्ग वाहतूक सेवेत दाखल झाल्यास नाशिक ते अक्कलकोट हा प्रवास नऊ तासांऐवजी चार तासांत करता येणार आहे.

एनएचएआयकडून १ हजार २७१ किमीचा चेन्नई ते सुरत द्रुतगती महामार्ग हाती घेण्यात आला. हा महामार्ग गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यातून जात आहे. सुरत, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, कलबुर्गी, कुरनूल, कडप्पा आणि तिरुपती अशा शहरांना जोडणार आहे. सुरत ते सोलापूर आणि सोलापूर ते चेन्नई असे या महामार्गाचे मुख्य दोन टप्पे असून दोन टप्प्यात आणखी काही टप्पे आहेत. त्यातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे नाशिक-अक्कलकोट द्रुतगती महामार्ग. ३७४ किमी लांबीचा आणि सहा मार्गिकेचा हा महामार्ग बांधण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी एनएचएआयकडून हायब्रिड अॅन्युइटी माॅडेलनुसार निविदा काढण्यात आल्या.

मात्र ही निविदा प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. तांत्रिक आणि आर्थिक कारणांमुळे पुढे हा प्रकल्प बीओटी तत्वावर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार एनएचएआयच्या सार्वजनिक-खासगी भागीदारी मूल्यांकन समितीने नुकतीच नाशिक-अक्कलकोट महामार्गाला मान्यता दिल्याची माहिती एनएचएआयच्या नाशिकमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. ही मान्यता मिळाल्यानंतर हा प्रकल्प बीओटी तत्वावर राबविण्यासाठी मान्यता घेण्यासाठी प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर या महामार्गासाठी नव्याने बीओटी तत्वावर निविदा काढल्या जातील आणि त्यानंतर पुढील कार्यवाही करून प्रकल्प मार्गी लावला जाईल असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाशिक ते अक्कलकोट महामार्ग नाशिक ते अहिल्यानगर आणि अहिल्यानगर ते अक्कलकोट अशा दोन टप्प्यात बांधला जाणार आहे. नाशिक ते अहिल्यानगर टप्पा १५२ किमीचा तर अहिल्यानगर ते अक्कलकोट टप्पा २२२ किमी असेल. ३७४ किमीचा हा महामार्ग कार्यान्वित झाल्यास नाशिक ते अक्कलकोट अंतर केवळ चार तासांत पार करता येणार आहे. आजच्याघडीला हे अंतर पार करण्यासाठी नऊ तास लागतात. सुरत ते चेन्नई द्रुतगती महामार्ग कार्यान्वित झाल्यास नाशिक ते सुरत अंतर दोन तासात पार करता येणार आहे. चेन्नई ते सुरत महामार्ग नवसारी येथे दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाला जोडला जाणार आहे. त्यामुळे पुढे दिल्लीकडे जाणेही सोपे होणार आहे.