मुंबई- बेपत्ता असलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या तपासात वेश्याव्यवसायाचे रॅकेट उघडकीस आले आहे. या मुलीवर तिच्या सावत्र वडिलांनी बलात्कार केला होता तसेच आईनेच वेश्यावसायात ढकलले होते. या त्रासाला कंटाळून पीडित मुलगी पळून नालासोपाऱ्यात राहण्यासाठी गेली होती. चारकोप पोलिसांनी मुलीची आई, सावत्र वडील तसेच एका रिक्षाचालकाला अटक केली आहे. या कारवाईच्या वेळी पोलिसांनी वेश्या व्यवसायात अडकलेल्या ३ अन्य बांगलादेशी महिलांची देखील सुटका केली आहे.

कांदिवलीच्या चारकोप पोलीस ठाण्यात १५ वर्षीय मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या आईने दिली होती. मागील ५ दिवसांपासून तिचा काही ठावठिकाणा लागत नसल्याचे तिच्या आईने पोलिसांना सांगितले होते. चारकोप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने या मुलीचा शोध घ्यायला सुरवात केली. पीडित मुलीच्या मोबाईलचे तपशील मिळवून तांत्रिक तपास सुरू केला. ती मुलगी नालासोपाऱ्यात असल्याची माहिती मिळाली. पोलीस तिला आणण्यासाठी नालासोपाऱ्यात गेले. मात्र ती घरी येण्यास तयार नव्हती. पोलिसांनी तिचे मन वळवून तिला पोलीस ठाण्यात आणले.

आणि तिच्या अश्रूंचा बांध फुटला

त्या मुलीला आपल्या घरी जायचे नव्हते. पोलिसांनी तिला विश्वासात घेऊन तिला बोलते केले. त्यावेळी तिच्या अश्रूचा बांध फुटला आणि तिने जे सांगितले ते ऐकून पोलीसही हादरले. पीडित मुलगी आईसह कांदिवली रहात होती. तिच्या आईने २८ वर्षीय इसमाशी दुसरे लग्न केले होते. ते तिघे एकत्र रहात होते. मात्र ६-७ महिन्यांपूर्वी तिच्या सावत्र वडिलांनी तिच्यावर वारंवार बलात्कार केला. त्यानंतर तिच्या आईने तिला मदत करण्याऐवजी चक्क वेश्या व्यवसायात ढकलले. मिरा रोड, भाईंदर येथील हॉटेल मध्ये पीडित मुलीची आई तिला बळजबरीने वेश्या व्यवसाय करण्यासाठी पाठवू लागली. त्यासाठी ती एका ग्राहकाकडून १२०० रुपये घेत होती. तिला विक्रमसिंग परमार (५५) हा रिक्षाचालक दररोज मिरा रोडला घेऊन जात होता. त्या मुलीच्या असहाय्यतेचा फायदा घेत तो रिक्षाचालक देखील तिच्यावर सतत बलात्कार करत होता.

मैत्रीणीच्या मदतीने पलायन

तिने हे काम करणार नाही असे आईला सांगितले होते. मात्र तिची आई ऐकायला तयार नव्हती. त्यामुळे तिने घरातून पळ काढला होता. या काळात पीडित मुलीची मिरा रोड येथील एका वेश्याव्यसाय करणाऱ्या मुलीशी ओळख झाली होती. त्या मुलीने नुकतेच लग्न केले होते आणि वेश्या व्यवसाय सोडून नालासोपारा येथे राहत होती. पीडित मुलगी तिच्याकडे आश्रयाला गेली होती.

तीन बांगलादेशी महिलांची सुटका

पीडित मुलीच्या चौकशीत पोलिसांना वेश्या व्यवसायाबाबत समजले. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून तीन बांगलादेशी महिलांची सुटका केली. त्यांना फसवून मुंबईत आणले होते. त्यांच्याकडून बळजबरीने वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्या तिन्ही महिलांची सुटका केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपींवर विविध गुन्हे दाखल

१५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला बळजबरीने वेश्याव्यसायात ढकलल्याप्रकरणी चारकोप पोलिसांनी मुलीची ३८ वर्षीय आई, २८ वर्षीय सावत्र वडील तसेच रिक्षाचालक विक्रमसिंग परमार (५५) या तिघांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४ (२) (एम), ६५ (१), ७९, ११८ (१), १४३ (४), १४४ (१), ३५१(२), पोक्सो कायद्याच्या कलम ४,६, ८, १२, १७ तसेच अनैतिक व्यापार अधिनियमाच्या कलम ४,५, ७५ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.