मुंबई : मुंबई महानगरपालिका सार्वजनिक – खासगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर रुग्णालयांचा पुनर्विकास करीत आहे. त्यानुसार मानखुर्दमधील लल्लुभाई कंपाउंड मल्टीस्पेशालिटी रुग्णालय आणि गोवंडीतील शताब्दी रुग्णालयाचा पुनर्विकास करण्यात येत आहे. मात्र त्यानंतर ही दोन्ही रुग्णालये खासगी संस्थांच्या माध्यमातून चालविण्यात येणार असल्याने रुग्णांना उपचारांसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे स्थानिक रहिवासी, विविध नागरी समूह, सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था आणि राजकीय पक्ष अशा २२ हून अधिक संघटनांनी एकत्र येऊन सोमवारी दुपारी मुंबई महानगरपालिकेच्या एम-पूर्व विभाग कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले.
मुंबई महानगरपालिकेने ५ मार्च २०२५ रोजी लल्लुभाई कंपाउंड रुग्णालयाच्या कामकाजासाठी खाजगी भागीदार शोधण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली. त्यानंतर १३ जून रोजी ‘नागरी आरोग्य सहकार्य’ तत्वाअंतर्गत शताब्दी रुग्णालयासाठी सुद्धा निविदा काढण्यात आली. यामध्ये १०० खाटांचे खासगी वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा प्रस्तावही समाविष्ट आहे. शताब्दी रुग्णालयातील ५८१ पैकी ७० खाटा सर्वसामान्य रुग्णांसाठी, तर ३० टक्के खाटा महापालिकेच्या संदर्भित रुग्णांसाठी राखीव असणार आहेत. तसेच लल्लुभाई कंपाउंड रुग्णालयातील ४१० खाटांपैकी १५० खाटा महापालिकेच्या रुग्णांसाठी आरक्षित असतील, तर उर्वरित २६० खाटा सर्वसामान्यांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. मात्र या रुग्णालयांमध्ये रुग्णांवर सवलतीच्या दरामध्ये उपचार होणार आहेत. तसेच या रुग्णालयामध्ये उपचारांसाठी मुंबईतील पत्ता असलेले नारिंगी किंवा पिवळे शिधावाटपपत्रिका असणे आवश्यक आहे. त्यामुळे स्थलांतरित कामगार, योग्य कागदपत्र नसलेले नागरिक आणि मुंबईतील अनेक गरजू कुटुंबांना आरोग्य सेवांपासून वंचित ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या निर्णयाविरोधात सोमवारी एम पूर्व विभाग कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले.
शताब्दी व लल्लुभाई कंपाउंड रुग्णालयांबरोबरच मुंबईतील अन्य शासकीय रुग्णालयाचे सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) माध्यमातून खाजगीकरण रद्द करावे. एम-पूर्व विभागातील सर्व प्रसूतीगृहांमध्ये नवजात अतिदक्षता विभाग सुरू करा, सर्व रुग्णालये व आरोग्य केंद्रांतील रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करून तीन महिन्यांमध्ये भरती प्रक्रिया पूर्ण करावी, मोफत निदान प्रयोगशाळा सेवा सुरू करावी, प्रत्येक १५ हजार लोकसंख्येमागे एक दवाखाना या प्रमाणात ३८ नवीन दवाखाने पुढील तीन महिन्यांत सुरू करावेत, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. अन्यथा मुंबई महानगरपालिकेविरोधात जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा जन आरोग्य अभिनयानचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अभय शुक्ला यांनी यावेळी दिला.