मुंबई : म्हाडाच्या पुणे मंडळाने पुण्यातील १५ टक्के एकात्मिक योजनेसह २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील ४१८६ घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. या ४१८६ घरांसाठी २१ नोव्हेंबरला सोडत काढली जाणार असून या सोडतीसाठी नोंदणी, अर्जविक्री – स्वीकृतीला गुरुवारपासून (११ सप्टेंबर) सुरुवात झाली. नोंदणी, अर्जविक्री – स्वीकृती प्रक्रिया १ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. तर २१ नोव्हेंबरला दुपारी १२ वाजता सोडतीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

पुणे मंडळाने पुणे विभागातील घरांसाठी २०२४ मध्ये सोडत काढली होती. तर पंतप्रधान आवास योजनेतील ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्वावरील २९९ घरांसह म्हाडा गृहनिर्माण योजनेतील १६८३ घरांसाठी अर्जविक्री – स्वीकृती प्रक्रिया सुरुच आहे. आता पुणे मंडळाने गुरुवारी २० टक्के आणि १५ टक्के योजनेतील ४१८६ घरांसाठी सोडतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार १५ टक्के एकात्मिक गृहनिर्माण योजनेतील ८६४ घरे आणि २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील ३३२२ घरे अशा एकूण ४१८६ घरांसाठी गुरुवारपासून नोंदणी, अर्जविक्री – स्वीकृती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. संगणकीय पद्धतीने अर्ज भरण्यासाठीची मुदत ३१ ऑक्टोबरला रात्री ११.५९ वाजता संपणार आहे. तर आरटीजीएस-एनईएफटीसह अनामत रक्कम भरण्याची मुदत १ नोव्हेंबरला बँकांच्या कार्यालयीन वेळेपर्यंंत असणार आहे. अर्जविक्री – स्वीकृती प्रक्रिया संपल्यानंतर ११ नोव्हेंबरला स्वीकृत अर्जांची प्रारुप यादी, तर १७ नोव्हेंबरला पात्र अर्जांची अंतिम यादी पुणे मंडळाकडून प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर २१ नोव्हेंबरला दुपारी १२ वाजता पुण्यात ४१८६ घरांच्या सोडतीचा निकाल प्रसिद्ध करून सायंकाळी ६ वाजता विजेत्यांची यादी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.

सोडतीतील १५ टक्के एकात्मिक योजनेतील घरे ४२ चौ. मीटर ते ६६ चौ.मीटर क्षेत्रफळाची असून या घरांच्या किंमती १३ लाख ६६ हजार ते ३० लाखांच्यादरम्यान आहेत. तर २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील बहुतांश घरे अल्प गटासाठी असून या घरांच्या किंमती १३ लाख ते ३८ लाखांच्या दरम्यान आहेत. पुण्यात खासगी विकासकांच्या प्रकल्पातील घरे म्हाडाच्या माध्यमातून परवडणाऱ्या दरात खरेदी करण्याची संधी या सोडतीद्वारे इच्छुकांना उपलब्ध होणार आहे.